हॉटेलकडून जो साबण दिला जातो तो दुसऱ्यांनी वापरलेला असतो का? अशा साबणांचं काय केलं जातं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:36 IST2026-01-02T11:35:16+5:302026-01-02T11:36:40+5:30
Interesting Facts : आपल्याला कधी प्रश्न पडलाय का की, हॉटेल्सकडून देण्यात आलेल्या आणि आपण वापरलेल्या साबणांचं पुढे काय होतं?

हॉटेलकडून जो साबण दिला जातो तो दुसऱ्यांनी वापरलेला असतो का? अशा साबणांचं काय केलं जातं?
Interesting Facts : सुट्ट्यांमध्ये कुठेतरी फिरायला गेल्यावर हॉटेल्स किंवा कॉटेजमध्ये थांबण्याशिवाय पर्याय नसतो, काही कामानिमित्ताने एखाद्या दुसऱ्या शहरात गेलात तरी सुद्धा हॉटेल हाच पर्याय असतो. अलिकडे लोकांचं फिरण्याचं प्रमाण बघता अलिकडे हॉटेल्सची संख्याही खूप वाढलीये आणि हॉटेल्सकडून मिळणाऱ्या सोयी-सुविधांमध्येही वाढ झाली आहे.
काही हॉटेल्स तर ग्राहकांना टूथपेस्टपासून ते साबणापर्यंत सगळंच पुरवतात. रोज शाम्पू आणि साबणही नवीन दिला जातो. लोक सामान्यपणे दोन ते पाच दिवस हॉटेलमध्ये राहतात. आपणही कधी हॉटेलमध्ये थांबले असाल आणि या सुविधांचा अनुभव घेतला असेलच. पण आपल्याला कधी प्रश्न पडलाय का की, हॉटेल्सकडून देण्यात आलेल्या आणि आपण वापरलेल्या साबणांचं पुढे काय होतं? तेच साबण दुसऱ्या ग्राहकांना दिलं जात असेल का? या प्रश्नांचं उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत.
हॉटेलमधील वापरलेल्या साबणांचं काय केलं जातं?
ज्या वस्तूंचा आपण वापर करत नाही आणि ज्या वस्तू पॅक्ड असतात त्या अनेकजण आपल्या जवळच्या लोकांना, मित्रांना किंवा नातेवाईकांना देतो. पण मग हॉटेलमधील वापरलेल्या साबणांचं काय केलं जातं? आपल्या आश्चर्य वाटेल की, अनेक नामवंत हॉटेलमध्ये वापरून शिल्लक राहिलेले साबण किंवा शाम्पू कचऱ्याच्या डब्यात टाकल्या जात नाहीत. हॉटेलमधील या वस्तू गरीबांची स्वच्छतेची समस्या सोडवण्यासाठी उपयोगात आणल्या जातात.
एका रिपोर्टनुसार दररोज हॉटेल्सच्या रूममधून हजारो वस्तू गोळा केल्या जातात. ज्यांपासून गरीबांना फायदा होतो. 'क्लीन द वर्ल्ड' आणि जगातील काही इतर संस्थांनी एकत्र येऊन ही समस्या दूर करण्यासाठी ग्लोबल सोप प्रोजेक्ट नावाचं एक संयुक्त अभियान सुरू केलं आहे. जे फारच चांगलं आणि प्रेरणादायी असं आहे.
आता आपल्याला नक्कीच प्रश्न पडू शकतो की, दुसऱ्यांनी वापरून शिल्लक राहिलेलं साबण गरीबांना वापरायला दिले जातात का? तर असं नाहीये. हॉटेलमधील वापरलेले साबण अशा गरीब लोकांना दिले जातात जे लोक ते खरेदी करू शकत नाहीत वा जे लोक प्रदूषणामुळे वेगवेगळ्या आजारांनी पीडित आहेत. २००० साली काही संस्थांनी यावर चर्चा केली होती.
ग्लोबल सोप प्रोजेक्टच्या माध्यमातून हॉटेलमधून घेण्यात आलेल्या साबणांचा वापर नवीन साबण तयार करण्यासाठी केला जातो. नंतर या वस्तू वेगवेगळ्या गरीब देशांमध्ये पाठवल्या जातात. या देशात राहणारे गरीब लोकही या अभियानाचा लाभ घेतात. यासाठी अनेक संस्था काम करतात. हे लोक हॉटेल्समधून वेगवेगळ्या वस्तू मिळवतात आणि त्या स्वच्छ करून, रिसायकल करून गरीबांमध्ये वाटतात. त्यांची शुद्धताही तपासली जाते. त्याशिवाय ते कुणाला दिले जात नाहीत.