भेंडीवरून पडलंय का मुंबईच्या 'भेंडी बाजार'चं नाव? सत्य वाचाल तर मारून घ्याल कपाळावर हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:44 IST2026-01-05T16:36:18+5:302026-01-05T16:44:26+5:30
Interesting Facts : प्रसिद्ध शेफ रणवीर बरारने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एका रहस्याचा उलगडा केला आहे. गंमत म्हणजे भेंडीची भाजी बनवत बनवत त्याने एक ऐतिहासिक बाब सांगितली.

भेंडीवरून पडलंय का मुंबईच्या 'भेंडी बाजार'चं नाव? सत्य वाचाल तर मारून घ्याल कपाळावर हात
Interesting Facts : मुंबईतील अनेक ठिकाणं आपल्या वेगळ्या नावांमुळे किंवा त्या ठिकाणातील एखाद्या खास गोष्टीमुळे चर्चेत असतात. मुंबईतील एक असंच ठिकाण म्हणजे 'भेंडी बाजार'. भेंडी बाजारात इमारती एकमेकींवर जणू झोपल्यात असं वाटतं. गर्दी इतकी असते की, बाहेर कसं पडावं असा प्रश्न पडतो. दुकानातील आवाज सतत कानावर पडतात. भलेही इथे भरपूर गोंगाट, गोंधळ असतो, पण एक वेगळीच एनर्जी इथे जाणवते. अनेकांना असं वाटत असेल की, या भागाचं नाव 'भेंडी'वरून ठेवण्यात आलं असेल. लोकही सहजपणे भेंडी बाजार...भेंडी बाजार असं म्हणतात. पण लोक इथेच फसतात. गमतीदार बाब म्हणजे या भागाचा भेंडीच्या भाजीसोबत काहीही संबंध नाही.
प्रसिद्ध शेफ रणवीर बरारने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एका रहस्याचा उलगडा केला आहे. गंमत म्हणजे भेंडीची भाजी बनवत बनवत त्याने एक ऐतिहासिक बाब सांगितली. जी अनेकांना माहीत नसेल.
शेफ बरारनुसार, हे नाव ब्रिटिश काळाशी संबंधित आहे. हा भाग क्रॉफर्ड मार्केटच्या अगदी मागे आहे. इंग्रज आपल्या साध्यासोप्या भाषेत याला 'बिहाइंड द बाजार'(Behind the Bazaar) म्हणत होते. पण स्थानिक लोकांसाठी याचा उच्चार करणं अवघड होतं. हळूहळू याच बिहाइंड द बाजारची जागा 'भेंडी बाजार' असं झालं.
भांड्यांचा संदर्भ
या भागाची केवळ 'बिहाइंड द बाजार' ही एकच कहाणी नाही. काही लोक याबाबत वेगळी थेअरी मांडतात. त्यांचं मत आहे की, हे नाव मराठी शब्द 'भांडी'वरून पडलेलं असू शकतं.
इतिहासानुसार, या भागात फार पूर्वी कुंभारांची वस्ती होती. हे लोक मातीची भांडी बनवत होते आणि विकत होते. त्यामुळे असंही होऊ शकतं की, ज्या ठिकाणाला लोक आधी 'भांडी बाजार' म्हणत होते, ते कालांतराने बदलून 'भेंडी बाजार' पडलं. थेअरी काहीही असो, पण या ठिकाणाचा भेंडीच्या भाजीसोबत काहीही संबंध नाही हे नक्की.