जेवणाचे बिल झाले 42 हजार अन् ग्राहकाने टीप दिली 8 लाखांची, वेट्रेसने सहकाऱ्यांमध्ये वाटले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 19:30 IST2023-02-21T19:23:01+5:302023-02-21T19:30:22+5:30
टीपमध्ये मिळालेल्या रकमेतून ही महिला वेटर परदेशात फिरण्याचा विचार करत आहे.

जेवणाचे बिल झाले 42 हजार अन् ग्राहकाने टीप दिली 8 लाखांची, वेट्रेसने सहकाऱ्यांमध्ये वाटले पैसे
अनेकदा हॉटेलमध्ये चांगली सर्व्हिस देणाऱ्या वेटरला लोक टीप देतात. ही टीप एकूण बिलाच्या अतिशय शुल्लक असते. पण, ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एका महिला वेटरला लाखो रुपयांची टीप मिळाल्याची घटना घडली आहे. एवढी मोठी टीप पाहून त्या महिलेला अश्रू अनावर झाले.
लॉरेन नावाची ही महिला वेटर युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे आणि गिल्सन साउथ यारा रेस्टॉरंटमध्ये पार्टटाईम नोकरीही करते. एका श्रीमंत ग्राहकाला लॉरेनची सेवा आणि वागणूक इतकी आवडली की, तो खूश झाला आणि त्याने तिला 8 लाखांहून अधिकची टीप दिली. ही टीप पाहून लॉरेनला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे जेवणाचे एकूण बिल फक्त 42 हजार रुपये झाले होते.
लॉरेन या आता या उदार ग्राहकाचे कौतुक करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा ग्राहक एक क्रिप्टो व्यावसायिक होता. त्याच्याकडे सुमारे 10 अब्ज रुपयांची मालमत्ता आहे. लॉरेन सध्या शिक्षण घेत आहे आणि एका रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणूनही काम करते. तिने टीपमध्ये मिळालेल्या $10,000(आठ लाख रुपये) पैकी 3,000 तिच्या सहकारी कर्मचाऱ्यांसोबत शेअर केले आहेत. आता उरलेल्या पैशातून ती परदेशात सुट्टी घालवण्याचा विचार करत आहे.