मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:56 IST2025-10-07T18:12:43+5:302025-10-07T18:56:08+5:30
viral marksheet with swamiji photo: मार्कशीटवरचा असा प्रकार पाहून विद्यार्थ्यालाही धक्का बसला

मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
Viral Marksheet with babaji photo: मार्कशीट किंवा हॉलतिकीटावरील फोटो चुकीचा लागणे हा किती मोठा घोळ असतो हे प्रत्येकालाच माहिती आहे. कर्नाटकातील कोप्पल येथील विजयनगर श्री कृष्णदेवराय विद्यापीठात निष्काळजीपणाचा एक मोठा प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थ्याच्या मार्कशीटवर चक्क एका स्वामीजींचा फोटो लावण्यात आल्याचे समोर आले. मार्कशीटवर स्वामींचा फोटो पाहून विद्यार्थ्यालाही धक्का बसला. त्यानंतर विद्यार्थ्याने विद्यापीठातच या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्याच्या मार्कशीटचा फोटो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
कोप्पल येथील विजयनगर श्री कृष्णदेवराय विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या मार्कशीटवर स्वामीजींचा फोटो छापलेला आढळून आला. देवराज मूलीमणी नावाच्या विद्यार्थ्याची मार्कशीट पाहून सोशल मीडियावरही आता गोंधळ उडाला आहे. विजयनगर श्री कृष्णदेवराय विद्यापीठाचा भाग असलेल्या कोप्पल येथील गाविसिद्धेश्वर कला शाखेच्या वाणिज्य आणि विज्ञान विभागात ही घटना घडली. देवराजने एकात्मिक विद्यापीठ आणि महाविद्यालय व्यवस्थापन प्रणालीद्वारे ऑनलाइन मार्कशीटसाठी अर्ज केला होता. त्यादरम्यान हा विचित्र प्रकार घडला. जेव्हा देवराजला त्याची मार्कशीट मिळाली, तेव्हा तो अवाक् झाला. कारण त्याच्या फोटोऐवजी त्यावर स्वामीजींचा फोटो होता.
यावर विद्यापीठाचे मूल्यांकन रजिस्ट्रार एन.एम. साली यांनी उत्तर दिले. "विद्यार्थ्याने स्वतः UUCMS द्वारे त्याची माहिती ऑनलाइन प्रविष्ट केली. आम्ही याची पडताळणी करत नाही. मार्कशीट आमच्याकडे एकात्मिक विद्यापीठ आणि महाविद्यालय व्यवस्थापन प्रणालीकडून येते. त्यानंतर, आमचे काम ते प्रिंट करणे आणि त्यांना सुपूर्द करणे इतकेच आहे," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, जर चूक झाली असेल तर त्याच विद्यार्थ्याने त्यांची योग्य माहिती UUCMS मध्ये पुन्हा भरावी. ही फक्त या विद्यार्थ्याची समस्या नाही; इतर काही विद्यार्थ्यांनी सेल्फी फोटो आणि गुगल फोटो देखील अपलोड केले आहेत. आम्ही सर्वांकडून पुन्हा अर्ज मागवू आणि ते UUCMS ला पाठवू. त्यानंतर, आम्ही त्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र मार्कशीट देऊ. या प्रकरणाची चौकशी केली जाईल.