पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने म्हशीचा मृत्यू; दहशतीच्या वातावरणात 200 ग्रामस्थांनी घेतली रेबीज लस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 13:33 IST2025-12-29T13:32:04+5:302025-12-29T13:33:37+5:30
गावकऱ्यांनी त्याच म्हशीच्या दुधापासून बनवलेला रायता खाल्ला होता.

पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने म्हशीचा मृत्यू; दहशतीच्या वातावरणात 200 ग्रामस्थांनी घेतली रेबीज लस
UP News: उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उझानी तालुक्यातील पिपरौल गावात एका कुत्र्याच्या चाव्यामुळे म्हशीचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचे कारण म्हणजे, याच म्हशीच्या दुधापासून बनवलेला रायता ग्रामस्थांनी खाल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर, सुमारे 200 जणांनी खबरदारी म्हणून सरकारी रुग्णालयात रेबीजची लस घेतली.
तेराव्या विधीत संपूर्ण गावाने खाल्ला रायता
मिळालेल्या माहितीनुसार, 23 डिसेंबर रोजी पिपरौल गावात तेराव्या विधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संपूर्ण गावासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जेवणात दह्याचा रायताही देण्यात आला होता, जो मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी खाल्ला. नंतर माहिती मिळाली की, ज्या म्हशीच्या दुधापासून हा दह्याचा रायता तयार करण्यात आला होता, त्या म्हशीला काही दिवसांपूर्वी कुत्र्याने चावले होते.
म्हशीचा मृत्यू अन् संसर्गाची भीती
ग्रामस्थांनी सांगितले की, 26 डिसेंबर रोजी त्या म्हशीचा मृत्यू झाला. कुत्र्याच्या चाव्यामुळे आणि रेबीजची लक्षणे दिसून आल्यामुळेच म्हशीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही बाब समोर येताच गावात संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आणि मोठा गोंधळ उडाला. भीतीच्या वातावरणात शनिवार आणि रविवारी पुरुषांसह महिला, वृद्ध तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने उझानी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे 200 ग्रामस्थांनी रेबीज प्रतिबंधक लस घेतली.
आरोग्य विभागाची माहिती
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर मिश्रा यांनी सांगितले की, एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे म्हशीला रेबीजची लक्षणे दिसून आली आणि तिचा मृत्यू झाला, अशी माहिती मिळाली होती. ग्रामस्थांनी त्या म्हशीच्या दुधापासून तयार केलेला रायता खाल्ल्याचे समोर आल्यानंतर, खबरदारी म्हणून सर्वांना रेबीजची लस घेण्याचा सल्ला देण्यात आला. सामान्यतः दूध उकळल्यानंतर रेबीजचा धोका राहत नाही. मात्र, कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सध्या गावात कोणताही आजार पसरलेला नाही आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.