Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:42 IST2026-01-01T14:40:54+5:302026-01-01T14:42:22+5:30
Youtube Channel: डिजिटल कंटेट क्षेत्रात Ai मोठी कामगिरी करत आहे.

Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
Youtube Channel: आर्टिफिशिअल (AI) जोरावर डिजिटल कंटेंटच्या जगात मोठी क्रांती घडत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. केवळ Ai जनरेटेड व्हिडिओंच्या आधारे एका भारतीय यूट्यूब चॅनेलने अवघ्या एका वर्षात तब्बल 38 कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
‘बंदर अपना दोस्त’ ठरला जगातील सर्वाधिक पाहिला गेलेला AI चॅनेल
एका जागतिक अभ्यासानुसार भारतीय यूट्यूब चॅनेल 'बंदर अपना दोस्त' हे पूर्णपणे Ai निर्मित कंटेंट टाकणाऱ्या चॅनेल्समध्ये जगात सर्वाधिक पाहिले गेलेले चॅनेल ठरले आहे. या चॅनेलचे आतापर्यंत 2.07 अब्ज (बिलियन) व्ह्यूज झाले असून, 27.6 लाखांहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. हा अभ्यास व्हिडिओ एडिटिंग प्लॅटफॉर्म Kapwing ने केला आहे. या स्टडीत जगभरातील 15 हजारांहून अधिक लोकप्रिय यूट्यूब चॅनेल्सचे विश्लेषण करण्यात आले.
कमी खर्चात प्रचंड पोहोच
‘बंदर अपना दोस्त’ या चॅनेलवर मुख्यतः Ai द्वारे तयार केलेले माकडांच्या (Monkey Characters) शॉर्ट व्हिडिओ क्लिप्स अपलोड केल्या जातात. कोणताही मोठा प्रॉडक्शन खर्च, कलाकार किंवा चित्रीकरण नसतानाही हा कंटेंट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. अभ्यासानुसार, या चॅनेलची वार्षिक कमाई अंदाजे 38 कोटी रुपये इतकी आहे. ही यशोगाथा डिजिटल क्रिएटर्ससाठी Ai किती प्रभावी साधन ठरू शकते, याचे जिवंत उदाहरण मानली जात आहे.
यूट्यूब अल्गोरिदमही Ai कंटेंटला पसंती देतो
या स्टडीत आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे. यूट्यूबच्या रिकमंडेशन सिस्टीममध्ये Ai निर्मित कंटेंटचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. नवीन युजर्सना सुचवण्यात येणाऱ्या व्हिडिओंपैकी सुमारे 20% व्हिडिओ ‘Ai स्लोप’ कॅटेगरीतील असतात.
‘Ai स्लोप’ म्हणजे असे व्हिडिओ जे पूर्णपणे Ai ने तयार केलेले असतात आणि ज्यात मानवी सर्जनशीलता अत्यल्प किंवा नसते. यूट्यूब शॉर्ट्समध्ये हा ट्रेंड आणखी ठळक आहे. नवीन युजरला दाखवण्यात येणाऱ्या पहिल्या 500 शॉर्ट्सपैकी 33% शॉर्ट्स Ai जनरेटेड असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.