सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:49 IST2025-10-07T15:48:56+5:302025-10-07T15:49:42+5:30
एका दोन वर्षांच्या मुलाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवलं आहे. त्याच्या अद्भुत स्मरणशक्तीने त्याने हे घवघवीत यश मिळवलं.

सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका दोन वर्षांच्या मुलाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवलं आहे. त्याच्या अद्भुत स्मरणशक्तीने त्याने हे घवघवीत यश मिळवलं. आदित्य राम या मुलाने भारतातील राज्यांच्या राजधान्या, कर्नाटकातील ३१ जिल्हे आणि १२ राष्ट्रीय चिन्ह लक्षात ठेवून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवलं. अनेक मुलं दोन वर्षांची होईपर्यंत नीट बोलत नाहीत, पण आदित्यने सर्वांसमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे.
दोन वर्षांच्या आदित्य रामने त्याच्या वयापेक्षा मोठी कामगिरी केली आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंटवाल तालुक्यातील विठ्ठल येथील रहिवासी असलेल्या आदित्यने त्याच्या उल्लेखनीय स्मरणशक्तीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवलं. मूळचे रामनगर येथील रहिवासी असलेल्या रामकृष्ण आणि दीपिका यांचा मुलगा आदित्यने ही दमदार कामगिरी केली.
आदित्य २३ राष्ट्रीय नेत्यांची आणि ८ कन्नड ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांची नावे सहज सांगू शकतो. तो १६ फळे, ३२ प्राणी, १२ आकार, ८ ग्रह, हिंदी वर्णमालेतील अक्षरे आणि २४ देशांचे ध्वज देखील ओळखतो. या मुलाने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. यापूर्वी २०२२ मध्ये, हसन येथील अडीच वर्षांच्या यत्विक डी. गौडा याने फक्त ३४ सेकंदात भारतातील सर्व राज्ये आणि राजधान्यांची नावं सांगून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केला होता.
२०२० मध्ये, तुमकुर येथील दोन वर्षांच्या जानवी जगदेवने २१ रंग ओळखून विक्रम केला. आदित्यची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाल्याने आदित्यचे कुटुंब खूप आनंदी आहे. आदित्य बऱ्याच काळापासून सर्वकाही लक्षात ठेवत आहे. त्याच्या अद्भुत स्मरणशक्तीचं प्रदर्शन करून त्याने एक नवीन टप्पा गाठला आहे. त्याचं सर्वच जण भरभरून कौतुक करत आहेत.