पूर्व सायबेरियामध्ये असलेली 'मिरनी माईन' ही जगातली सर्वात मोठी हिऱ्यांची खाण आहे. या खाणीतून मोठ्या प्रमाणात हिरे काढले जात होते. ही खाण १७२२ फूट खोल आणि ३९०० फूट रूंद आहे. तसेच ही खाण म्हणजे जगातला दुसरा सर्वात मोठा मानवनिर्मित खड्डाही आहे.
ही खाण १३ जून १९५५ मध्ये सोव्हिएत भूवैज्ञानिकांच्या एका टीमने शोधली होती. ही खाण शोधणाऱ्या टीममध्ये यूरी खबरदिन, एकातेरिना एलाबीना आणि व्हिक्टर एवदीनको यांचा समावेश होता. तसेच ही खाण शोधल्यामुळे यूवी खबरदानी यांना १९५७ मध्ये लेनिन पुरस्कारही देण्यात आला होता.
या खाणीच्या विकासाचं काम १९५७ मध्ये सुरू करण्यात आलं होतं. इथे वर्षातले जास्तीत जास्त महिने वातावरण खराब असतं. हिवाळ्यात तर तापमान इतकं खाली येतं की, गाड्यांमधील इंधन गोठतं आणि टायर फुटतात.
असे म्हटले जाते की, ही खाण खोदण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जेट इंजिन आणि डायनामाइट्सचा वापर केला होता. रात्रीच्या वेळी ही खाण झाकली जाते, जेणेकरून मशीन्स खराब होऊ नये.
या खाणीचा शोध लागल्यानंतर रशिया हिऱ्यांचं उत्पादन करणारा जगातला तिसरा सर्वात मोठा देश झाला आहे. आधी या खाणीतून दरवर्षी १० मिलियन म्हणजेच एक कोटी कॅरेटचे हिरे काढले जात होते.
ही खाण इतकी विशाल आहे की, या खाणीच्या वरून उडणारे हेलीकॉप्टर खालून येणाऱ्या हवेच्या दबावामुळे क्रॅश झाले आहेत. त्यानंतर या खाणीवरून हेलिकॉप्टरच्या उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे. २०११ मध्ये ही खाण पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.