Planetary parade 2025: २१ जानेवारीला ग्रहांची परेड दुर्बिणीशिवाय पाहता येणार; बघा खगोलीय आविष्कार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:33 IST2025-01-21T16:32:39+5:302025-01-21T16:33:20+5:30
Planetary parade 2025: २०२५ च्या सुरुवातीलाच अवकाशात ग्रहांनी स्थलांतर सुरु केले आहे, मुख्य म्हणजे सहा ग्रह एका रेषेत आपल्याला दुर्बिणीशिवाय पाहता येणार आहेत.

Planetary parade 2025: २१ जानेवारीला ग्रहांची परेड दुर्बिणीशिवाय पाहता येणार; बघा खगोलीय आविष्कार!
ग्रह ताऱ्यांचे भ्रमण वर्षभर सुरूच असते. त्याचा परिणाम समस्त जीव सृष्टीवर तसेच ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या राशीवरदेखील होत असतो. मात्र हे ग्रह जेव्हा एका रेषेत येतात, तेव्हा त्याला 'प्लॅनेटरी परेड' (Planetary parade 2025) असे संबोधले जाते. हे दृष्य प्रेक्षणीय असते. यंदा हा योग २१ जानेवारी रोजी येत असून हा सुंदर नजारा इथून पुढे महिनाभर अर्थात २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पाहता येणार आहे, तोही दुर्बिणीशिवाय!
मोबाईलसमोर झुकलेल्या माना आकाशाकडे बघण्यास उंचावतच नाहीत. बालपणी पाहिलेले चंद्र चांदणे विस्मृतीत गेले. शहरी झगमगाटामुळे ताऱ्यांची शोभा पाहता येत नाही. ढगाआड लपलेला चंद्र प्रदूषित वातावरणामुळे अनेकदा दर्शनही देत नाही. अशातच खगोल विश्वात घडणाऱ्या घडामोडी आपले लक्ष वेधून घेतात. जसे की आजपासून सुरु होणारी ग्रहांची परेड! हे ग्रह जवळ जवळ आल्यामुळे एका रेषेत दिसतील पण त्यांचे स्थान पुढे मागे असेल, मात्र पृथ्वीवरून पाहताना ते एकाच रेषेत परेडला उभे असल्याचा भास निर्माण करतील. अशी माहिती फ्लोरिडामधील बिशप म्युझियम ऑफ सायन्स अँड नेचरच्या पर्यवेक्षक हन्ना स्पार्क्स यांनी दिली आहे.
ग्रहांची परेड केव्हा आणि कुठे पाहायची?
अशीच प्रकारची परेड गेल्या जूनमध्ये झाली होती, परंतु कोणत्याही विशेष उपकरणाशिवाय केवळ दोनच ग्रह पाहता आले. मात्र यंदा शुक्र, मंगळ, गुरू आणि शनि जानेवारीत आणि फेब्रुवारीमध्ये युरेनस आणि नेपच्यून हे परेडमध्ये सहभागी असलेले दिसतील.
या ग्रहांमध्ये मंगळ विशेषत: तेजस्वी होतो कारण तो थेट सूर्याच्या विरुद्ध स्थित आहे. शुक्र आणि शनि नैऋत्य दिशेला दिसतील. दक्षिण दिशेला गुरू आणि आग्नेय किंवा पूर्वेला मंगळ दिसून येईल. हे ग्रह इतर ताऱ्यांपेक्षा जास्त चमकतील आणि मंगळ लाल-केशरी बिंदूसारखा दिसेल. तर शुक्र आणि शनि जवळ असलेले दिसतील. हवेत प्रदूषण कमी असेल अशा रात्री हे दुर्मिळ दृष्य दुर्बिणीशिवाय पाहता येईल. त्यासाठी सूर्यास्तानंतर काही तासांनी गच्चीत किंवा मोकळ्या मैदानात जा आणि दक्षिण दिशेला ही ग्रहांची परेड सुरु असलेली पाहा.
आणखी एका ग्रहाचा सहभाग
फेब्रुवारीच्या शेवटी एक अस्पष्ट सैनिक या परेड मध्ये सामील होईल. तो सातवा ग्रह बुध असणार आहे. हे ग्रह हळूहळू वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर दिसू लागतील. हे विलोभनीय दृष्य पाहणे आणि पुढच्या पिढीला दाखवणे ही निसर्गाने दिलेली सुंदर भेट आहे, तिचा नक्कीच आनंद घ्या, असे मत खगोल शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.