चेष्टा महागात पडली; त्याच्या गर्लफ्रेंडसाठी तब्बल 68 लाखांची बोली लागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 17:34 IST2018-10-08T17:31:22+5:302018-10-08T17:34:17+5:30
गर्लफ्रेंडची विक्री करण्यासाठी त्यानं फोटो पोस्ट केला होता

चेष्टा महागात पडली; त्याच्या गर्लफ्रेंडसाठी तब्बल 68 लाखांची बोली लागली
मुंबई: चेष्टा मस्करी करताना हद्द ओलांडली की प्रकरण अंगाशी येऊ शकतं. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत असाच प्रकार घडला. आपल्या प्रेयसीची मस्करी करण्यासाठी डेल लीक्स नावाच्या व्यक्तीनं त्याची 37 वर्षीय प्रेयसी केली ग्रीव्सचा फोटो ईबे या शॉपिंग वेबसाईटवर टाकला. ही माझी यूज्ड गर्लफ्रेंड आहे, असं डेलनं कमेंटमध्ये लिहिलं होतं. डेलनं पोस्ट केलेल्या या फोटोवर कमेंटचा पाऊस पडला. यानंतर ईबेनं तो फोटो साईटवरुन हटवला.
डेलनं चेष्टा करण्यासाठी केलीचा फोटो ईबेवर अपलोड केला होता. मात्र लोकांनी हे प्रकरण चांगलंच गांभीर्यानं घेतलं. लोकांनी केलीसाठी बोली लावायला सुरुवात केली. हळूहळू ही बोली 70 हजार पाऊंडवर (68 लाख रुपये) गेली आणि एकच गोंधळ झाला. डेल आणि केली काही दिवसांपूर्वी खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी भर गर्दीत केलीनं डेलच्या पार्श्वभागावर फटका मारला. त्यामुळे चारचौघात डेलला अवघडल्यासारखं झालं. त्यामुळेच त्यानं केलीचा फोटो ईबेवर अपलोड केला.
शॉपिंग करताना झालेल्या त्या घटनेचा बदला घेण्यासाठी डेलनं प्रेयसीचा फोटो ईबेवर अपलोड केला. त्यामध्ये त्यानं केलीची तुलना वापरलेल्या गाडीशी केली. हा बदला डेलला चांगलाच महागात पडला. कारण अवघ्या 24 तासांमध्ये यावर तब्बल 81 हजार कमेंट्स आल्या. ही माझी वापरलेली गाडी आहे. या गाडीचे सुटे भाग हवे असतील, तरी तुम्ही ते विकत घेऊ शकता, असं डेलनं फोटोसोबत नमूद केलं होतं. यावर अनेकांनी कमेंट केल्या. त्यामुळे ईबे ही जाहिरात आपल्या वेबसाईटवरुन हटवली.