लाइव्ह स्ट्रिमिंग ठरलं ‘उडती शवपेटी’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 07:25 IST2025-10-09T07:25:05+5:302025-10-09T07:25:31+5:30
विमानातून नुकतंच केलेलं लाइव्ह स्ट्रीमिंग त्यांच्यासाठी अखेरचं ठरलं आणि त्यांनी काही दिवसांपूर्वीच विकत घेतलेलं विमान त्यांच्यासाठी ‘उडती शवपेटी’ ठरली !

लाइव्ह स्ट्रिमिंग ठरलं ‘उडती शवपेटी’!
तांग फेईजी. चीनमधले ५५ वर्षीय डिजिटल कन्टेंट क्रिएटर. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ते चीनमध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे लाखो चाहते आहेत. विशेषतः तरुणाई त्यांच्यावर फारच फिदा आहे. त्यांच्या धाडसी स्वभावामुळेही तरुणाईचा त्यांच्यावर जीव आहे. काही रिल्स तर त्यांनी अक्षरशः जीव धोक्यात घालून केल्या आहेत. पण याच धाडसी स्वभावानं त्यांचा अखेर घात केला.
विमानातून नुकतंच केलेलं लाइव्ह स्ट्रीमिंग त्यांच्यासाठी अखेरचं ठरलं आणि त्यांनी काही दिवसांपूर्वीच विकत घेतलेलं विमान त्यांच्यासाठी ‘उडती शवपेटी’ ठरली !
तांग फेईजी हे चिनी सोशल मीडिया ‘डॉयिन’वर नुकतंच एक लाइव्ह स्ट्रीमिंग करत होते. विमान उंचावर गेल्यानंतर त्यांचा विमानावरचा ताबा सुटला आणि त्यातचं त्यांचं निधन झालं. विशेष म्हणजे हा अपघात लाखो फॉलोअर्सनं थेट पाहिला.
पीपल मॅगझिनच्या अहवालानुसार टिकटॉकचं चिनी व्हर्जन डॉयिनवर लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान फेईजी यांचं अल्ट्रालाइट विमान अपघातग्रस्त झालं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात हा अपघात झाला. फेईजी यांच्या मृत्यूनंतर त्यांचं सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांचा विद्यमान कन्टेंट फक्त त्यांच्या फॉलोअर्सनाच पाहता येऊ शकतो. पण इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेईजी यांचा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात शेअर केला जातोय.
चिनी वृत्तसंस्था सीएनएसनुसार फेईजी विमानातच लाइव्ह स्ट्रीमिंग करीत होते. त्यांचे लाखो फॉलोअर्स ते पाहात होते. मात्र विमान उंचावर गेल्यानंतर त्यांची गडबड झाली. एकाच वेळी लाइव्ह स्ट्रीमिंग आणि विमान चालवणं ही कसरत त्यांना महाग पडली. थोड्याच वेळात त्यांचा विमानावरील ताबा सुटला आणि विमान खाली आदळलं. विमानाला आगही लागली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तांग फेईजी यांनी आपल्या आधीच्या व्हिडीओत सांगितलं होतं, त्यांनी हे अल्ट्रालाइट विमान ४९,००० डॉलर्सला (सुमारे ४३ लाख रुपये) विकत घेतलं होतं. हे विमान ताशी ६० मैल वेगानं उडू शकतं आणि २००० फूट उंचीवर पोहोचू शकतं.
जाणकारांचं म्हणणं आहे, तांग यांचं आणखी एक अतिरेकी साहस त्यांच्यावर जिवावर बेतलं. तांग यांना बऱ्याच दिवसांपासून स्वत:चं विमान विकत घ्यायचं होतं. आपल्या इच्छेप्रमाणे त्यांनी हे अल्ट्रा लाइट विमान विकतही घेतलं; पण पूर्ण प्रशिक्षण घेण्यापूर्वी आणि पुरेसा सराव होण्यापूर्वीच एकट्यानं विमान चालवण्याचं साहस त्यांना महाग पडलं. विमान उड्डाण करण्यापूर्वी त्यांनी केवळ सहा तासांचं ट्रेनिंग घेतलं होतं. तांग यांनी स्वत:च दावा करताना म्हटलं होतं की, फक्त सहा तासांच्या ट्रेनिंगमध्ये विमान चालवण्याची, नियंत्रित करण्याची कला मी आत्मसात केली आहे !
तांग यांनी सुरक्षा नियमांकडेही दुर्लक्ष केलं होतं. अपघाताच्या वेळी तांग यांनी हेल्मेट तर घातलेलं नव्हतंच, शिवाय त्यांच्याकडे पॅराशूटही नव्हतं. पॅराशूट असतं तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. अपघातग्रस्त होण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रसंग नव्हता. याआधी २०२४ मध्येही दोन वेळा फ्यूएल गेजमध्ये बिघाड झाल्यानं त्यांचं विमान ३० फूट उंचीवरून खाली कोसळलं होतं. त्यावेळी नशिबानं त्यांना साथ दिली होती, यावेळी मात्र नशिबानं त्यांच्याकडे पाठ फिरवली!