Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:31 IST2025-11-21T13:30:36+5:302025-11-21T13:31:33+5:30
अमेरिकेतील अलास्कामध्ये एक असे शहर आहे, जिथे सूर्य चक्क दोन महिन्यांसाठी ‘सुट्टी’वर गेला आहे.

Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
थंडीच्या दिवसांत आपल्याकडे धुकं आणि ढगांमुळे सूर्यदर्शन कमी होते, पण काही दिवसांत सूर्य एकदा तरी डोकावतोच. मात्र, अमेरिकेतील अलास्कामध्ये एक असे शहर आहे, जिथे सूर्य चक्क दोन महिन्यांसाठी ‘सुट्टी’वर गेला आहे. आर्कटिक सर्कलच्या उत्तरेकडील या शहरात १८ नोव्हेंबर रोजी वर्षातील अंतिम सूर्यास्त नोंदवला गेला आणि आता इथे २२ जानेवारी २०२६ पर्यंत सूर्योदय होणार नाही. म्हणजे, या शहरात आता ६६ दिवसांची अखंड रात्र सुरू झाली आहे.
उत्कियागविकमध्ये ध्रुवीय रात्र सुरू
\अलास्कातील सुमारे ४,६०० लोकसंख्या असलेले हे शहर, ज्याला पूर्वी 'बॅरो' म्हणून ओळखले जायचे, ते आर्कटिक सर्कलपासून सुमारे ४८३ किलोमीटर उत्तरेस स्थित आहे. या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे, दरवर्षी येथील नागरिकांना दोन महिन्यांहून अधिक काळ 'ध्रुवीय रात्र' अनुभवावी लागते. यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे, उत्तर गोलार्ध सप्टेंबर ते मार्च या कालावधीत सूर्यापासून दूर झुकलेला असतो. याचा परिणाम म्हणून, उत्तरेकडील अति-अक्षांशांवर दिवसाचा प्रकाश हळूहळू कमी होत जातो आणि डिसेंबर संक्रांतीच्या आसपास अंधार पूर्णपणे गडद होतो.
या दोन महिन्यांच्या काळात येथील लोकांना फक्त ऑरोरा बोरियालिस म्हणजेच 'उत्तरी ध्रुवीय प्रकाशा'ची चमक कधीकधी पाहायला मिळते. वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार, उत्कियागविकमध्ये आता पुढील सूर्योदय २२ जानेवारी २०२६ पूर्वी होण्याची शक्यता नाही.
तापमान शून्याच्या खाली, नागरिकांना मोठ्या अडचणी
ध्रुवीय रात्रीच्या काळात उत्कियागविकमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आणि आव्हानात्मक असते. मीडिया रिपोर्टनुसार, या काळात येथील तापमान अनेकदा शून्य डिग्री फारेनहाइटच्या खाली जाते. सूर्यप्रकाश नसल्यामुळे येथील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, वसंत ऋतू जसजसा जवळ येतो, तसतसा दिवसाचा प्रकाश हळूहळू परत येतो आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत येथील परिस्थिती पूर्णपणे बदलते. मे महिन्याच्या मध्यापासून ते ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत इथे चक्क सूर्य अजिबात मावळत नाही, म्हणजेच या काळात येथे २४ तास दिवसाचा उजेड असतो.
दक्षिण ध्रुवावर ६ महिन्यांचा दिवस
पृथ्वीच्या नैसर्गिक चमत्काराची ही घटना फक्त उत्तरेकडील भागापुरती मर्यादित नाही. दक्षिण ध्रुवावर तर ही घटना आणखी नाट्यमय होते. जेव्हा उत्तरेकडील आर्कटिक शहरे आठवड्यांपर्यंत अंधारात राहतात, तेव्हा दक्षिण ध्रुवावर जवळपास सहा महिने सूर्य अखंडपणे तळपत राहतो. याचे कारण म्हणजे पृथ्वीच्या अक्षाच्या झुकण्याचा सर्वाधिक परिणाम या ठिकाणावर होतो. म्हणजेच, जेव्हा आर्कटिकमध्ये गडद रात्र असते, तेव्हा दक्षिण ध्रुवात प्रखर सूर्यप्रकाश असतो आणि जेव्हा आर्कटिकमध्ये मध्यरात्रीचा सूर्य चमकतो, तेव्हा दक्षिण ध्रुवावर सहा महिन्यांची रात्र सुरू होते.