सामान्यत: लग्न म्हटलं तर घरात आनंद आणि उत्साहाचं वातावरण असते. संगीत, नाचगाणी यामुळे सगळेच खुश असतात. प्रत्येकाला वाटतं नव्या नवरा नवरीचं वैवाहिक आयुष्य मानसन्मानाने व्हावे. परंतु जगातील एक असा देश आहे जिथं लग्नानंतर नवऱ्याचं स्वागत फुलांनी नाही तर चिखल फेकून त्याला मारहाण करत केले जाते.
ही अजब प्रथा स्कॉटलंडच्या काही भागात निभावली जाते, ज्याला ब्लॅकनिंग ऑफ द ग्रूम असं म्हटलं जाते. या प्रथेत नवऱ्यावर चिखल फेकला जातो. त्याशिवाय अंडी आणि कचराही त्याच्या अंगावर टाकला जातो. त्यातून नवऱ्याला येणाऱ्या जीवनात संकटाचा सामना करण्यासाठी मजबूत बनवले जाते असं तिथल्या लोकांची श्रद्धा आहे. हा कुठलाही अपमान नाही तर तो प्रथा परंपरेचा एक भाग आहे. जो कित्येक वर्षापासून इथल्या लोकांनी कायम ठेवला आहे.
ही अनोखी अन् अजब वाटणारी प्रथा स्कॉटलंडच्या काही भागात सुरू आहे. ब्लॅकनिंग ऑफ द ग्रूम या परंपरेत लग्नाआधी नवऱ्याचे मित्र आणि नातेवाईक त्याला पकडून धरतात. त्यानंतर त्याच्या शरीरावर चिखल फेकला जातो. कचरा, अंडी आणि इतर गोष्टी त्याच्या अंगावर टाकल्या जातात. त्यानंतर नवऱ्याला त्याच अवस्थेत गावात फिरवले जाते. ही प्रथा नवऱ्याच्या पुढील आयुष्यात येणाऱ्या अडचणीत त्याला मजबूत ठेवण्याचं काम करते असं तिथले लोक सांगतात. इतकेच नाही तर या प्रथेत नवऱ्यावर फक्त चिखल आणि कचरा फेकला जात नाही तर त्याला सौम्य स्वरुपात मारहाणही होते. हा प्रकार लग्नातील लोक आनंदाने पाहत असतात.
ही प्रथा तिथल्या लोकांच्या दृष्टीने त्यांच्या परंपरेचा एक भाग आहे. नवऱ्याला मानसिकरित्या मजबूत ठेवणे आणि लग्नानंतर त्याच्या समोर येणाऱ्या अडथळ्यांना तोंड देण्यासाठी त्याला सक्षम करणे यासाठी ही प्रथा आहे. जो व्यक्ती या परंपरेत अपमान आणि वेदना सहन करतो त्याला पुढे जाऊन वैवाहिक जीवनात संकटे आणि आव्हाने पेलता येतात असं लोकांचे म्हणणे आहे. बाहेरील लोकांना हे आक्षेपार्ह किंवा विचित्र वाटू शकते, परंतु स्थानिकांसाठी ते लज्जास्पद नाही. त्यांच्या समाजात हा विधी शतकानुशतके जुनी परंपरा म्हणून स्वीकारली आहे. जग भलेही वेगाने मॉडर्न होत असेल तर परंतु आजही जगातील अनेक भागात तिथल्या प्रथा परंपरेला अनन्य साधारण महत्त्व आहे.