कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:30 IST2025-10-08T14:29:59+5:302025-10-08T14:30:18+5:30
कंपनी आणि कर्मचारी यांच्यात ३ वर्ष कायदेशीर लढा सुरू राहिला. अखेर ३ वर्षांनी सॅंटियागोतील कोर्टाने निकाल सुनावला

कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
सॅंटियागो - चिलीमध्ये नोकरी करणारा कर्मचारी रातोरात श्रीमंत बनला. या व्यक्तीसोबत असं काही घडलं, जी एखाद्या सिनेमातील कहाणीच वाटेल. या कर्मचाऱ्याच्या खात्यात कंपनीने त्याच्या मासिक पगाराच्या ३३० पट अधिक रक्कम पाठवली. अचानक इतकी रक्कम खात्यावर जमा होताच हा माणूस लोभी झाला आणि त्याने कंपनीला पैसे परत करण्यास नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहचले. विशेष म्हणजे कोर्टाच्या लढाईतही कर्मचाऱ्याने विजय मिळवला. त्यामुळे खात्यातील सर्व रक्कम संबंधित कर्मचाऱ्याकडेच ठेवण्याची कोर्टाने परवानगी दिली.
द मेट्रो रिपोर्टनुसार, खाद्य कंपनी डॅन कंसोर्सियो इंडस्ट्रीयल डे एलिमेंटोस चिली याचं हे प्रकरण आहे. संबंधित कर्मचारी या कंपनीत सहाय्यक म्हणून काम करत होता. ३ वर्षापूर्वी त्याचा पगार ३८६ पाऊंड म्हणजे ४६१६२ रूपये इतका होता. मे २०२२ मध्ये कंपनीने तांत्रिक बिघाडामुळे त्याच्या खात्यावर तब्बल १ लाख २७ हजार पाऊंड इतकी मोठी रक्कम ट्रान्सफर केली. जास्त रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर गेली असता कंपनीने ही रक्कम पुन्हा मागितली. सुरुवातीला कर्मचारीही रक्कम परत देण्यास तयार झाला. २ दिवस त्याने हे पैसे त्याच्या खात्यावर ठेवले परंतु तिसऱ्याच दिवशी त्याने राजीनामा दिला. त्यानंतर कंपनीचे फोन कॉल उचलणे आणि उत्तर देणेही टाळले. त्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यावर चोरीचा आरोप लावला आणि कोर्टात खटला दाखल केला.
कंपनी आणि कर्मचारी यांच्यात ३ वर्ष कायदेशीर लढा सुरू राहिला. अखेर ३ वर्षांनी सॅंटियागोतील कोर्टाने निकाल सुनावला. ही चोरीची घटना नाही तर अनअथॉराइज्ड कलेक्शनचं प्रकरण आहे. त्यामुळे या प्रकरणी गुन्हेगारी खटला पुढे सुरू ठेवण्यास कोर्टाने नकार दिला. त्यामुळे संबंधित कर्मचारी चोरीच्या खटल्यातून सुटला. त्याशिवाय हे पैसे अधिकृतपणे त्याच्याकडे ठेवण्यासही कोर्टाच्या निकालाने मान्यता मिळाली. कंपनीसाठी हा मोठा झटका होता. परंतु पैसे वसूल करण्यासाठी कंपनी दिवाणी कोर्टात प्रयत्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आम्ही कोर्टाचा निकाल वाचून पुढील संभाव्य कायदेशीर पाऊल उचलू. सर्व पर्यायांवर आम्ही विचार करत आहे असं कंपनीने म्हटलं.