इथे होळीच्या दिवशी सगळ्यांसमोर तरूणीला पळवून नेतात तरूण, काहीच करू शकत नाहीत घरवाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 13:09 IST2026-02-27T12:36:36+5:302026-02-27T13:09:57+5:30
Holi Weird Tradition : आज आम्ही आपल्याला होळीला पार पाडल्या जाणाऱ्या एका वेगळ्याच प्रथेबाबत सांगणार आहोत. ही प्रथा नक्कीच आपल्याला थक्क करणारी असेल.

इथे होळीच्या दिवशी सगळ्यांसमोर तरूणीला पळवून नेतात तरूण, काहीच करू शकत नाहीत घरवाले
Holi Weird Tradition : देशातील दिवाळीसोबतच सगळ्यात जास्त जर कोणत्या सणाची वाट पाहिली जात असेल तर तो म्हणजे होळी. होळी (Holi 2026) आणि धुलिवंदन म्हणजे धुळवड या दोन्ही दिवशी लोक पारंपारिक रिवाज पार पाडत खूप मजा-मस्ती करतात. लहान मुलेच नाही तर मोठेही रंग खेळण्याचा मनमुराद आनंद घेतात. आश्चर्याची बाब म्हणजे देशभरात होळीच्या वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळे रितीरिवाज पार पाडले जातात. आज आम्ही आपल्याला होळीला पार पाडल्या जाणाऱ्या एका वेगळ्याच प्रथेबाबत सांगणार आहोत. ही प्रथा नक्कीच आपल्याला थक्क करणारी असेल.
होळीला लग्न जुळतात
मध्य प्रदेशच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक राहतात. हे लोक अनेक वर्षांपासून त्यांच्या परंपरा तशाच पार पाडतात. येथील एका गावात भील आदिवासी लोक होळीच्या दिवशी एक फारच रोमांचक परंपरा पार पाडतात. या गावात एक बाजार भरतो. ज्याला हाट असं म्हटलं जातं. या हाटमध्ये भील आदिवासी लोक होळीचं आवश्यक साहित्य खरेदी करतात. त्यासोबतच भील तरूण-तरूणी आपल्यासाठी नवं नातं शोधण्यासाठीही येतात. भील समाजातील तरूण - तरूणी वर्षभर या सणाची आतुरतेने वाट बघत असतात.
यांच्या परंपरेनुसार, बाजारामध्ये गावातील सगळे लोक जमतात. त्यानंतर भील तरूण आपल्या हातांनी मांदल नावाचं एक वाद्य वाजवतात. यादरम्यान ते पारंपारिक नृत्यही करतात. नृत्य करता करता भील तरूण तिथे बसलेल्या तरूणींच्या गालावर गुलाल लावतात. भील तरूण ज्या तरूणीच्या गालावर गुलाल लावतात त्या तरूणीनेही त्या तरूणाला परत गुलाल लावला तर ही दोघांची नात्यासाठी सहमती समजली जाते.
तरूणींना पळवून नेतात तरूण
त्यानंतर तरूण त्या तरूणींना सर्वांसमोर पळवून नेतात. यात दोघांचीही सहमती असते आणि याला दोघांचं लग्न मानलं जातं. तरूणी त्यांची इच्छा असेल त्या तरूणासोबत पळून जाऊ शकतात. यात त्यांचे कुटुंबियही काही करू शकत नाहीत. दुसरीकडे जर तरूणाने गुलाल लावल्यावर तरूणी त्याला गुलाल लावत नसेल तर तरूण दुसऱ्या एखाद्या तरूणीला गुलाला लावू शकतात. तिने पुन्हा गुलाल लावला तर त्यांचं नातं ठरतं. यात जोर जबरदस्ती काही केली जात नाही.