५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:29 IST2025-09-29T14:28:57+5:302025-09-29T14:29:25+5:30
मित्र येतो, बुक केलेल्या वेळेनुसार वेळ घालवतो. वेळ संपल्यानंतर निघून जातो.

५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन
केरळमधील काही भागांत नवा ट्रेंड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. Friend on Rent...मित्र बनवण्यासाठी मित्र भाड्याने घ्या, हा मित्र ५० रुपये प्रति तास या हिशोबाने मिळणार आहे. मग तो तुमच्यासोबत फिरायला, कॉफी प्यायला, सिनेमा पाहायला अथवा कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात येईल. या प्रकारच्या मैत्रीच्या अजब ट्रेंडमुळे केरळमध्ये चिंता वाढली आहे.
दोस्त अड्डा, FRND, पालमॅचसारखे APP, फेसबुक आणि टेलिग्रामवर खूप प्रसिद्ध आहेत. यूजर्स या App मधून प्रोफाईल ब्राऊज करून वय, भाषा आणि त्यांच्या आवडीनुसार मित्र शोधू शकतात. उपलब्ध असणाऱ्यांपैकी कुणालाही बुक करू शकतात. परंतु हे व्यासपीठ केवळ मित्र बनवणे या हेतूने आहे. त्यात ना शारीरिक संबंध, ना स्पर्श करणे, ना व्यक्तिगत प्रश्न आणि कुठल्याही खासगी ठिकाणी न भेटणे हे आहे. मित्र येतो, बुक केलेल्या वेळेनुसार वेळ घालवतो. वेळ संपल्यानंतर निघून जातो.
समाजतज्त्र काय बोलतात?
केरळच्या विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख बुशरा बेगम यांनी म्हटलं की, ही प्रवृत्ती वाढत्या शहरी विचारांचे प्रतिबिंब दाखवते. युवा त्यांच्या घरापासून दूर जात आहेत. एकल कुटुंब पद्धतीमुळे राहणीमान बिघडले आहे. कुणाकडेही खर्च करण्यासाठी वेळ नाही. कामाच्या बोझाखाली मैत्री संपत चालली आहे. अशा परिस्थितीत पैसे देऊन मैत्री करणे सोपे असू शकते. परंतु ही नाते मनापासून जोडलेल्या नात्यासारखी नसतात, ज्याचे मूल्य पैशात मोजता येत नाही असं त्यांनी सांगितले.
केरळमध्ये काही युजर्सने असाही आरोप केला आहे, ज्यात त्यांच्याकडून अधिकचे पैसे घेऊन जाहिरातीतून दिशाभूल केली जाते. एकाने सोशल मीडियात पोस्ट करत म्हटलंय की, हे एक सामान्य सोशल नेटवर्किंग APP म्हणून लोकांसमोर आणले जाते. कुठलाही अनोळखी व्यक्ती निवडून आपण गंभीर संकटात सापडू शकतो हेदेखील कळत नाही. जग इतके सुरक्षित नाही, जितके या APP मध्ये दाखवले जाते असं त्याने सांगितले. तर एकटेपणा महामारीसारखा झाला आहे. ज्या लोकांना एकटेपणा नकोसा झालाय ते कुणाच्या तरी शोधात असतात. परंतु समाज हे स्वीकारणार आहे की नाही त्यावर हे अवलंबून आहे. पैशाच्या व्यवहारापेक्षा नाती जपणे अधिक आवश्यक असते असंही बुशरा बेगम यांनी म्हटलं.