थंडीचा कहर! थंडीमुळे कुडकुडत मंडपात बेशुद्ध पडला नवरदेव, नवरीने लग्नास दिला नकार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 13:18 IST2024-12-17T13:17:17+5:302024-12-17T13:18:00+5:30
झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील अशाच एका लग्नाची सध्या चर्चा रंगली आहे. इथे एका तरूणाला कडाक्याच्या थंडीत लग्न करणं चांगलंच महागात पडलं.

थंडीचा कहर! थंडीमुळे कुडकुडत मंडपात बेशुद्ध पडला नवरदेव, नवरीने लग्नास दिला नकार!
सध्या लग्नाचा सीझन असून वेगवेगळ्या लग्नांची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असते. कधी लग्नातील थाटाची चर्चा होते तर कधी वादाची. कधी नवरदेव वेळेवर लग्न मोडतो तर कधी नवरी लग्नास नकार देते. बरं लग्नाला नकार देण्याची कारणंही फार अजब असतात. झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील अशाच एका लग्नाची सध्या चर्चा रंगली आहे. इथे एका तरूणाला कडाक्याच्या थंडीत लग्न करणं चांगलंच महागात पडलं. थंडीमुळे त्याचं लग्न व्हायच्या आधीच मोडलं.
मीडिया रिपोर्टनुसार, अर्णव नावाच्या तरूणाचं लग्न अंकिता नावाच्या तरूणीसोबत होणार होतं. दोन्हीकडील लोकांच्या सहमतीने लग्न एका प्रायव्हेट गार्डनमध्ये होणार होतं. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. वेळेवर सगळे रितीरिवाज पार पाडले जात होते.
सगळ्यात आधी दोन्ही पक्षांकडून एकमेकांचं स्वागत करण्यात आलं. नंतर खुल्या आकाशाखाली स्टेज उभा करण्यात आला. त्यावर हार घालण्याचा रिवाज करण्यात आला. पुढे सप्तपदीची तयारी झाली. यासाठीही मंडप मोकळ्या आकाशाखाली उभा करण्यात आला होता.
नवरी-नवरदेव सप्तपदीसाठी मंडपात आले. पंडिताने रितीरिवाज सुरू केले. तेव्हाच अचानक नवरदेव थंडीने कुडकुडत बेशुद्ध पडला. त्याचं शरीर थंड झालं होतं. कुटुंबियांनी लगेच त्याचे हात-पाय घासणं सुरू केलं. लगेच एका स्थानिक डॉक्टरला बोलवण्यात आलं आणि त्याला सलाईन लावण्यात आली. थंडी घालवण्यासाठी त्याला इंजेक्शनही दिलं गेलं. साधारण दीड तासांनंतर नवरदेव बरा झाला. आता नवरदेव सप्तपदी घेण्यासाठी तयार होता. पण नवरीने वेळेवर लग्न करण्यास नकार दिला.
नवरीचं म्हणणं होतं की, मुलाला काहीतरी आजार आहे. त्यामुळे ती त्याच्यासोबत लग्न करणार नाही. नवरीचा संशय या कारणानेही वाढला की, सामान्यपणे नवरदेव वरात घेऊन वरीच्या घरी जात असतो, पण या लग्नासाठी नवरीला नवरदेवाच्या घरी बोलवण्यात आलं होतं. अशात दोन्ही पक्षातील लोकांचा वाद वाढला.
नंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोन्हीकडील लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण याचा काही फायदा झाला नाही. सकाळी वाजता नवरीकडील लोक मुलीला घेऊन निघून गेले.