कुत्र्याला आणण्यासाठी बूक केले प्रायव्हेट जेट, खर्च केले तब्बल 24 लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 16:30 IST2021-12-10T16:26:31+5:302021-12-10T16:30:08+5:30
कोरोना नियमांमुळे ऑस्ट्रेलियातील जोडप्याला आपल्या पाळीव कुत्र्याला न्यूझीलंडमध्येच सोडावे लागले होते.

कुत्र्याला आणण्यासाठी बूक केले प्रायव्हेट जेट, खर्च केले तब्बल 24 लाख रुपये
अनेकजण घरात कुत्रा पाळतात. कुत्रा हा अतिशय प्रामाणिक प्राणी असून, अनेकजण त्याला आपल्या घरातील सदस्याप्रमाणे वागणूक देतात. कुत्र्यासाठी लोक काहाही करायला तयार होतात. अशाच प्रकारची एक घडना ऑस्ट्रेलियात घडली आहे. आपल्या पाळीव कुत्र्यासाठी एका जोडप्याने 24 लाख रुपयांचा खर्च केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, एका ऑस्ट्रेलियातील जोडप्याचा पाळीव कुत्रा न्यूझीलंडला अडकला होता. कोविड नियमांमुळे त्या कुत्र्याला ऑस्ट्रेलियाला परत आणता आले नव्हते. मागील अनेक महिन्यांपासून तो न्यूझीलंडमध्ये होता. पण, आता ख्रिसमसमुळे कुत्र्याला घरी आणण्याचा निर्णय या जोडप्याने घेतला. अखेर कुत्र्याचे मालक टॅश आणि डेव्हिड डेने यांनी त्याला परत आणण्यासाठी 24 लाख रुपये खर्चून खासगी विमान बूक केले.
कुत्र्याला ख्रिसमसच्या आधी घरी आणायचे होते
टॅशने सांगितले, कोविडमुळे आम्हाला आमच्या कुत्र्याला सोबत नेता आले नव्हते. त्यामुळेच आम्ही त्याला एका खासगी विमानाने ऑस्ट्रेलियाला आणण्याचा निर्णय घेतला. ख्रिसमस आमच्यासाठी खूप मोठा आणि आनंदचा सण आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या कुत्र्याशिवाय ख्रिसमस साजरा करायचा नव्हता. त्यामुळेच आम्ही त्याला खासगी विमानाने आमच्याजवळ आणले.