मंगळावरुन पृथ्वीवर कोसळलेल्या सर्वात मोठ्या उल्कापिंडाचा लिलाव; किंमत ₹34 कोटी, काय खास?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 14:11 IST2025-07-09T14:10:41+5:302025-07-09T14:11:55+5:30
हा पृथ्वीवर कोसळलेला मंगळाचा सर्वात मोठा तुकडा आहे.

मंगळावरुन पृथ्वीवर कोसळलेल्या सर्वात मोठ्या उल्कापिंडाचा लिलाव; किंमत ₹34 कोटी, काय खास?
अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये या शतकातील सर्वात अनोखा लिलाव होणार आहे. जगातील प्रसिद्ध लिलाव कंपनी सोथेबीजने मंगळ ग्रहावरुनपृथ्वीवर कोसळलेल्या सर्वात मोठ्या उल्कापिंडाचा(NWA 16788) लिलाल आयोजित केला आहे. या उल्कापिंडाचे वजन 24.5 किलो (54 पौंड) असून, त्याची किंमत तब्बल 2 मिलनय ते 4 मिलियन डॉलर्स (सुमारे 15 ते 34 कोटी रुपये) असू शकते. हा लिलाव येत्या 16 जुलै 2025 रोजी न्यू यॉर्कमध्ये होणार आहे.
NWA 16788 म्हणजे काय?
NWA 16788 हा मंगळावरुन पृथ्वीवर कोसळलेला एक उल्कापिंड आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये आफ्रिकेतील नायजर देशातील अगाडेझ भागातील सहारा वाळवंटात एका शिकारीने त्याचा शोध लावला होता. हा दगड खूप खास आहे. कारण तो पृथ्वीवर आढळणारा मंगळाचा सर्वात मोठा तुकडा आहे. त्याचे वजन 24.67 किलो असून, हा यापूर्वी सापडलेल्या उल्कापेक्षा 70% मोठा आहे.
अतिशय दुर्मिळ
पृथ्वीवर आतापर्यंत 77,000 हून अधिक उल्कापिंड सापडले आहेत, परंतु त्यापैकी फक्त 400 उल्कापिंड मंगळावरील आहेत. NWA 16788 हे या 400 उल्कापिंडांपैकी 6.5%, म्हणजेच अत्यंत दुर्मिळ आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, लाखो वर्षांपूर्वी मंगळावर एक मोठा उल्कापिंड आदळला होता. या टक्करमुळे मंगळाचा हा तुकडा अवकाशातून पृथ्वीवर कोसळला. या उल्कापिंडाचा रंग लाल-तपकिरी आहे, जो मंगळाच्या मातीसारखा दिसतो. त्याच्या काही भागांमध्ये काचेसारखा थर आहे, जो अवकाशात वेगाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर तयार झाला. त्यातील 21.2% भाग मास्केलिनाइट (एक प्रकारचा काच), पायरोक्सिन आणि ऑलिव्हिन सारख्या खनिजांपासून बनलेला आहे.
हा मंगळाचा तुकडा आहे, हे कसे सिद्ध झाले?
या उल्कापिंडाचा एक छोटासा तुकडा शांघाय खगोलशास्त्र संग्रहालयात तपासणीसाठी पाठवण्यात आला. तेथे शास्त्रज्ञांनी त्याची रचना आणि खनिजे तपासली आणि तो मंगळावरुन आल्याची पुष्टी केली. जून 2024 मध्ये हवामानशास्त्र संस्थेनेही त्याला मान्यता दिली. त्याच्या पृष्ठभागावर फारच कमी गंज किंवा नुकसान आहे, याचा अर्थ असा की तो अलीकडेच पृथ्वीवर पडला असावा.
लिलावाचे खास मुद्दे
सोथेबीजचा हा लिलाव 'गीक वीक'चा भाग आहे, ज्यामध्ये अवकाश आणि विज्ञानाशी संबंधित अनोख्या गोष्टी विकल्या जातात. NWA 16788 हा 8 ते 15 जुलै दरम्यान न्यू यॉर्कमधील सोथेबीज शोरुममध्ये प्रदर्शित केला जाईल, जेणेकरून लोक तो पाहू शकतील. लिलाव 16 जुलै रोजी दुपारी 2 वाजता (UTC) सुरू होईल. तज्ञांचा अंदाज आहे की, हा उल्कापिंड 2 ते 4 दशलक्ष डॉलर्समध्ये विकला जाऊ शकतो.
यापूर्वीही असा लिलाव झालेला
मंगळावरील उल्कापिंड यापूर्वी लिलावात विकले गेले आहेत, परंतु NWA 16788 त्याच्या आकार आणि दुर्मिळतेमुळे सर्वात खास आहे. 2021 मध्ये माली येथे सापडलेल्या ताओडेनी 002 उल्कापिंडाचे वजन 14.51 किलो होते, परंतु एनडब्ल्यूए 16788 त्यापेक्षा खूपच मोठे आहे. गेल्या वर्षी, सोथेबीज येथे स्टेगोसॉरसचा जीवाश्म 44.6 दशलक्ष डॉलर्सला विकला गेला होता.