'बॉयफ्रेंड भाड्याने मिळेल!'... कुठे चाललोय आपण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 01:45 PM2018-08-29T13:45:42+5:302018-08-29T13:55:50+5:30

आपण अनेकदा थोरामोठ्यांच्या तोंडून घोर कलियुग हो...! किंवा आमच्या वेळी असं नव्हतं बाई...! असं ऐकतो. पण अनेकदा यंग जनरेशन या बोलण्याकडे दुर्लक्ष करते.

this app lets you rent a boyfriend or a girlfriend to cure depression | 'बॉयफ्रेंड भाड्याने मिळेल!'... कुठे चाललोय आपण?

'बॉयफ्रेंड भाड्याने मिळेल!'... कुठे चाललोय आपण?

Next

आपण अनेकदा थोरामोठ्यांच्या तोंडून घोर कलियुग हो...! किंवा आमच्या वेळी असं नव्हतं बाई...! असं ऐकतो. पण अनेकदा यंग जनरेशन या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव आणि विचारांची बदललेली बिरूदं यांमुळे अनेक रूढी-परंपरांचा विरोध करून सध्याची तरूणाई अनेक गोष्टी आपल्या स्टाईलने करताना दिसते. यामागेही अनेक तर्क लावण्यात येतात. मग अनेकदा अगदी सहज बदलणाऱ्या तंत्रज्ञानाला दोष दिला जातो. घरातल्या एखाद्या मुलाने चुकून थोडा वेगळा रस्ता निवडला तर मग घरात आणि नातेवाईकांमध्ये फार गोंधळ माजतो आणि आता तुमचं मुल वाया गेलं म्हणत आई-वडिलांचं सांत्वन करण्यात येतं. पण अनेकदा पिढ्यांमधील अंतर मोजण्यात आपण हे विसरून जातो की, बदलत्या जमान्यासोबत, जीवनशैलीसोबत अनेक संकल्पना बदलल्या जातात. त्यानुसार आपल्यातही बदल घडवून आणणं गरजेचं असत. मात्र हे बदल घडवताना अनेकदा चुकीच्या पद्धतीचाही वापर करण्यात येतो. 

सध्या असचं एक उदाहरण समोर आलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा थोरामोठ्यांच्या तोंडून त्यांचा काळ आणि आताचा काळ यांच्यातील वर्गीकरण ऐकायला मिळत आहे. आपण अनेकदा 'ईएमआय' किंवा 'भाड्याने देणे आहे' असे बोर्ड पाहतो. किंवा घर, गाडी भाड्याने घेतो. सध्याच्या दुकानांमध्ये सर्रास ईएमआयने वस्तू मिळतील अशा पाट्या दिसून येतात. पाट्याच कशाला... अनेक ऑनलाईन अॅप्सही उपलब्ध आहेत. ज्याद्वारे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता. पण सध्या चर्चा एका वेगळ्याच गोष्टीची रंगली आहे. ती म्हणजे तुम्हाला चक्क बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड भाड्याने घेता येणार आहे. दचकलात ना???? पण तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. ‘रेंट अ बॉयफ्रेन्ड’ RABF या अॅपद्वारे तुम्ही आता बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड भाड्याने घेऊ शकणार आहात. अजूनही विश्वास बसत नसेल ना?? तुम्ही मुंबई किंवा पुण्यासारख्या मेट्रोपोलिटन सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला तुमच्यासाठी एखादा जोडीदार या अॅपद्वारे भाड्याने घेणं सहज शक्य होणार आहे. जाणून घेऊयात हा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड भाड्याने देणाचा घाट घातला आहे तो प्रकार नक्की आहे तरी काय?

'RABF' म्हणजे आहे तरी काय?

कौशल प्रकाश नावाच्या एका तरूणाने हे अॅप लॉन्च केलं आहे. 15 ऑगस्ट रोजी हे अॅप लॉन्च करण्यात आलं. हे अॅप लॉन्च करण्यामागील उद्देश विचारला असता, कौशलने सांगितले की, तो स्वतः 3 वर्ष डिप्रेशनमध्ये होता. त्यातून बाहेर आल्यानंतर त्याच्या डोक्यात या कल्पनेने उदय घेतला. एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन उपचार करण्यापेक्षा आपण आपल्या एखाद्या मित्रमैत्रिणीकडे आपलं मन मोकळं केलं किंवा आपल्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगितल्या तर त्यामुळे नैराश्य कमी होण्यास नक्की मदत होईल असं त्याचं म्हणणं आहे.

या अॅपमध्ये रजिस्टर करण्यासाठी तुमचं वय हे 22 ते 25 वयोगटातील असणं गरजेचं आहे. तसेच या अॅपद्वारे तुम्हाला भाड्याने बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड घेण्यासाठी पैसे भरण्याची गरज आहे. जर तुम्ही एखाद्या सामान्य व्यक्तिची निवड केली तर तुम्ही साधारणतः 300 ते 500 रूपयांपर्यंत भाडे भरावे लागणार आहे. तेच जर तुम्ही सेलिब्रिटींची निवड केलीत तर त्यासाठी तुम्हाला 3000 रूपये भरावे लागणार आहेत. आणि जर तुम्ही मॉडेलची निवड केलीत तर मात्र तुम्हाला प्रत्येक तासाचे 2000 रूपये भरावे लागतील आणि त्या व्यक्तीला भेटल्यानंतर दोघांच्या फिरण्याचा आणि खाण्याचा खर्च तुम्हालाच करावा लागणार आहे. 

तुम्ही 10वी किंवा 12 पास असाल तर सहज या अॅपमध्ये  बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड म्हणून रजिस्टर करू शकता. भाड्याने  बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड घेण्याची संकल्पना आपल्या देशात नवीन असली तरी ती जगभरात सर्रास वापरण्यात येते. या अॅपमध्ये रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला 6 मुलांचा किंवा मुलींचा पर्याय देण्यात येतो. त्यातील एकाची तुम्ही निवड करू शकता. सध्या ही सुविधा केवळ मुंबई आणि पुण्यात सुरु करण्यात आली असून येत्या काळात इतर शहरांतही त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. पाश्च्यात्य संस्कृतीच्या पायावर उभी राहिलेली ही संकल्पना कितपत यशस्वी ठरतेय, तसेच या संकल्पनेला तरूणाई कोणत्या दृष्टीकोनातून स्विकारेल हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: this app lets you rent a boyfriend or a girlfriend to cure depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.