निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:08 IST2025-12-29T11:05:55+5:302025-12-29T11:08:48+5:30
Hottest Place On Earth : पृथ्वीवर एक असे ठिकाण आहे, ज्यासमोर सहारा वाळवंटातील उष्णताही फिकी पडेल.

निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
जेव्हा आपल्याला उन्हाळ्याच्या झळा सोसाव्या लागतात, तेव्हा आपण सहारा वाळवंट किंवा आखाती देशांची आठवण काढतो. मात्र, पृथ्वीवर एक असे ठिकाण आहे, ज्यासमोर सहारा वाळवंटातील उष्णताही फिकी पडेल. इथिओपियामधील 'डलॉल'हे ठिकाण जगातील सर्वात उष्ण ठिकाण म्हणून ओळखले जाते. या ठिकाणचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, इथे 'थंडी' हा ऋतूच अस्तित्वात नाही! बाराही महिने हे ठिकाण आगीच्या गोळ्यासारखे धगधगत असते.
वर्षाचे ३६५ दिवस रेकॉर्डतोड उष्णता
डलॉलच्या नावावर जगातील सर्वाधिक सरासरी वार्षिक तापमानाचा विक्रम आहे. इथले सरासरी तापमान ३४.६ डिग्री सेल्सिअस इतके मोजले गेले आहे. इतर उष्ण ठिकाणांवर किमान रात्री किंवा हिवाळ्यात तरी थोडा थंडावा मिळतो, पण डलॉलमध्ये तसे घडत नाही. हिवाळ्यातही येथील पारा ३० अंशांच्या खाली जात नाही, तर उन्हाळ्यात हेच तापमान ४९ ते ५० डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचते. यामुळेच याला 'पृथ्वीवरील नरक' असेही म्हटले जाते.
हुबेहूब मंगळ ग्रहासारखे दिसते हे ठिकाण
डलॉल हे इथिओपियातील 'डनाकिल डिप्रेशन'मध्ये वसलेले आहे. हे ठिकाण तांत्रिकदृष्ट्या ज्वालामुखीच्या मुखावर असून समुद्रसपाटीपासून सुमारे १३० मीटर खाली आहे. येथील जमीन पिवळी, हिरवी, नारंगी आणि पांढऱ्या रंगाच्या छटांनी भरलेली दिसते. मात्र, हा रंग झाडांमुळे नाही, तर जमिनीखालील सल्फर, लोह ऑक्साईड आणि मीठ यांच्या रासायनिक अभिक्रियेमुळे निर्माण झाला आहे. हे दृश्य पाहून आपल्याला आपण पृथ्वीवर नसून मंगळ ग्रहावर आहोत की काय, असा भास होतो.
अत्यंत विषारी आणि धोकादायक
हे ठिकाण केवळ उष्णच नाही, तर अत्यंत प्राणघातक देखील आहे. येथील हायड्रोथर्मल पूलमध्ये असलेले पाणी इतके आम्लयुक्त आहे की, त्याचा पीएच स्तर शून्यापेक्षाही कमी असू शकतो. म्हणजे या पाण्यात पडल्यास हाडंही विरघळून जातील. याशिवाय, इथल्या हवेत सतत सल्फर डाय ऑक्साईड आणि क्लोरीनसारखे विषारी वायू मिसळलेले असतात, ज्यामुळे श्वास घेणेही कठीण होते.
माणसं नसलेलं 'घोस्ट टाऊन'
१९०० च्या सुरुवातीला इटालियन शासनाकाळात येथे मीठ आणि पोटॅश काढण्यासाठी खाणकाम सुरू झाले होते. मात्र, निसर्गाची ही रौद्र रूपं आणि जीवघेणी उष्णता सहन न झाल्यामुळे लोकांनी ही वस्ती सोडून दिली. आज हे ठिकाण पूर्णपणे निर्जन असून त्याला 'घोस्ट टाऊन' म्हटले जाते. निसर्गाची ही भयंकर जादू पाहण्यासाठी आज केवळ काही धाडसी पर्यटक आणि शास्त्रज्ञच येथे भेट देतात.