केवळ १४ व्या वर्षी मृत्यूदंडाडी शिक्षा मिळणं हे ऐकायलाच विचित्र वाटतं. पण आजपासून ७५ वर्षांआधी अमेरिकेत असं झालंय. यात सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे कोर्टाने केवळ १० मिनिटात या मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. ज्यानंतर त्याला इलेक्ट्रिक चेअरला बांधून विजेचा झटका देऊन मृत्यूदंडाची शिक्षा दिली. 

ही धक्कादायक घटना १९४४ मध्ये घडली होती. या मुलाचं नाव होतं जॉर्ज स्टीनी. तो एका आफ्रिकन-अमेरिकन म्हणजे कृष्णवर्णीय होता. त्या काळात कृष्णवर्णीयांसोबत कठोर भेदभाव केला जात होता. त्यामुळे असे बोलले जाते की, या मुलाला शिक्षा देण्याचा निर्णय एक एकतरफी होता. कारण न्यायाधीशांच्या ज्या बेंचने हा निर्णय दिला होता ते सगळेच श्वेतवर्णीय होते.

(Image Credit : latimes.com)

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, त्याने गुन्हा काय केला होता. २३ मार्च १९४४ ची घटना आहे. जॉर्ज त्याची बहीण कॅथरीनसोबत घराबाहेर उभा होता. तेव्हा दोन मुली एक ११ वर्षीय बॅटी जनू बिनिकर आणि आट वर्षीय  मेरी एमा थॉमस एका फूलाच्या शोधात तिथे आल्या. त्यांनी त्या फूलाबाबत जॉर्जला आणि त्याची बहीण कॅथरीनला विचारलं. त्यानंतर जॉर्ज हा त्या मुलींच्या मदतीसाठी त्यांच्यासोबत गेला. नंतर तो घरी परत आला, पण त्या दोन मुली गायब झाल्या.

(Image Credit : am.com.mx)

जेव्हा मुलींच्या घरच्यांनी त्यांचा शोध सुरू केला तेव्हा त्यांना कळालं की, त्या शेवटच्या जॉर्जसोबत बघितल्या गेल्या होत्या. मुलींच्या परिवाराने जॉर्जच्या वडिलांसोबत आजूबाजूला मुलींचा शोध घेतला. पण मुली काही सापडल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही मुलींचे मृतदेह रेल्वे रूळावर आढळून आले. 

(Image Credit : Pixabay) (सांकेतिक फोटो)

दोघींचेही मृतहेद मिळाल्यावर पोलिसांनी संशयित म्हणून जॉर्जला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरू केली. नंतर पोलिसांकडून सांगण्यात आले की, जॉर्जने आपला गुन्हा मान्य केलाय. त्याने दोन्ही मुलींची हत्या केली. मुलींच्या डोक्यावर इतकी गंभीर जखम होती की, डोक्याचे तुकडे झाले होते.

दोन्ही मुलींच्या हत्येसाठी जॉर्ज आणि त्याचा भाऊ जॉनीला अटक करण्यात आली. पण नंतर जॉनीला सोडण्यात आलं. पोलिसांनी नंतर एक लिखित पत्र सादर केलं. त्यात जॉर्जने मुलींची हत्या केल्याचं मान्य केलं होतं. पण आश्चर्याची बाब म्हणजे त्यावर जॉर्जची स्वाक्षरी नव्हती. पण त्यावर कुणीच लक्ष दिलं नाही. नंतर जॉर्जला कोलंबियाच्या तुरूंगात तीन महिन्यांसाठी ठेवण्यात आलं. 

(सांकेतिक फोटो)

जॉर्जच्या केसची सुनावणी करण्यासाठी एक समिती बसवण्यात आली तेही केवळ एका दिवसात. पण जॉर्ज कुष्णवर्णीय असल्याने त्याच्या बाजूने केवळ एकच बाजू मांडण्यात आली. त्यावेळी १४ वर्षाच्या मुलाला वयस्कच मानलं जात होतं. या केसमधील सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे या समितीतील सगळेच न्यायाधीश हे श्वेत वर्णीय होते. 

या केसची आणखी एक बाब म्हणजे जॉर्जच्या प्रश्नांना क्रॉस चेक केलं गेलं नव्हतं आणि ना त्याला बचावासाठी काही बोलण्याची संधी देण्यात आली. साधारण अडीच तास सुनावणी झाली आणि केवळ १० मिनिटात जॉर्जला कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. 
त्याकाळी मृत्यूदंडाची शिक्षा इलेक्ट्रिक चेअरवर दिली जात होती. त्यामुळे जॉर्जला इलेक्ट्रिक चेअरवर बांधले. असेही सांगितले जाते की, जॉर्ज कमी उंचीमुळे खुर्चीत फिट येत नव्हता त्यामुळे त्याला पुस्तकांवर बसवण्यात आले होते. ते पुस्तक बायबल होतं. त्यानंतर जॉर्जला २४०० व्होल्टचा विजेचा झटका देण्यात आला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला.

(Image Credit : wltx.com)

जॉर्ज आजही अमेरिकेतील सर्वात कमी वयात मृत्यूदंडाची शिक्षा मिळणारा व्यक्ती आहे. त्याच्या मृत्यूच्या ७० वर्षांनी म्हणजे २०१४ मध्ये ही केस पुन्हा ओपन करण्यात आली होती. ज्यात हे मान्य करण्यात आलं होतं की, त्याच्यासोबत अन्याय झाला होता. जॉर्जच्या जबाबीतून हे स्पष्ट होत नव्हतं की, त्याने दोन्ही मुलींची हत्या केली. म्हणजे त्याला निर्दोष ठरवण्यात आलं. ही केस अमेरिकेच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वाईट केस मानली जाते. ज्यात एका निर्दोष व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती.


Web Title: 14 years old boy George Stinney was sentenced to death in 1944

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.