यावलजवळ तरुणाचा खून, दोन संशयित स्वतःच पोलिसांना शरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 23:48 IST2025-08-29T23:47:15+5:302025-08-29T23:48:25+5:30
यावल-दहिगाव रस्त्यावर शुक्रवारी रात्री ९:३० वाजता एका २१ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

यावलजवळ तरुणाचा खून, दोन संशयित स्वतःच पोलिसांना शरण
यावल, जळगाव: यावल-दहिगाव रस्त्यावर शुक्रवारी रात्री ९:३० वाजता एका २१ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर दोन संशयित आरोपी स्वतःच दुचाकीवरून पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिली.
इम्रान युनूस पटेल (२१, रा. सुरेश आबा नगर, दहिगाव, ता. यावल) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे आपल्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. तिथे इम्रानचा मृतदेह आढळून आला.
या खुनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.