जळगावात आई-वडिलांसमोरच तरुण मुलाची भोसकून हत्या; आक्रोशाने गावकरी झाले सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 17:26 IST2025-03-22T17:25:46+5:302025-03-22T17:26:14+5:30

मारेकरी २ वर्षाच्या चिमुरड्याच्या रडण्याच्या आवाजाने गहिवरले नाहीत. युवराजच्या उजव्या छातीच्या बाजूला धारधार शस्त्राने वार करून, मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले.

Young boy stabbed to death in front of parents incident in jalgaon taluka | जळगावात आई-वडिलांसमोरच तरुण मुलाची भोसकून हत्या; आक्रोशाने गावकरी झाले सुन्न

जळगावात आई-वडिलांसमोरच तरुण मुलाची भोसकून हत्या; आक्रोशाने गावकरी झाले सुन्न

Jalgaon Murder : शेतातील दादर काढणीची घाई सुरू होती, शेतात महिला मजूर दाखल झाले. दादर काढणीच्या कामाला सुरुवात होईलच, त्याआधी वृद्ध आई-वडिलांचा किंचाळण्याचा आवाज झाला. शेतात आई-वडिलांच्या समोरच युवराज कोळी यांच्यावर हॉटेल व्यावसायिक भरत पाटील यांच्यासह तिघांनी चाकूने सपासप वार करीत हत्या केल्याची हृदयद्रावक घटना जळगाव तालुक्यातील कानसवाडा शिवारात शुक्रवारी सकाळी ७:३० वाजता घडली आहे.

कानसवाडा-शेळगावचे उपसरपंच राहिलेले युवराज कोळी यांचा शेळगाव येथील भरत पाटील यांच्यासोबत गुरुवारी रात्री वाद झाला. त्या वादातून सकाळी भरत पाटील यांच्यासह तिघांनी युवराज कोळी यांच्या कानसवाडा येथील शेतात जाऊन निघृण हत्या केली. आई-वडिलांनी व शेतात कामाला आलेल्या काही महिला मजुरांनी कोळी यांना एका खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. खुनाच्या या घटनेने भादली व परिसर हादरला आहे. कोळी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईक, मित्रांची मोठी गर्दी झाली होती.

दोन वर्षांचा मुलगा रडत राहिला, ते मारतच राहिले
गुरुवारी युवराज कोळी आपल्या दोन वर्षाच्या चिराग नावाच्या मुलालाही शेतात घेऊन आले होते. युवराज कोळीवर हल्ला झाला, त्यावेळेस चिराग त्याच शेडमध्ये होता. हल्ला झाला, त्याचवेळी चिराग रडत होता. चिरागचे आजी-आजोबा मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी मारेकरी मात्र २ वर्षाच्या चिमुरड्याच्या रडण्याच्या आवाजाने गहिवरले नाहीत. युवराजच्या उजव्या छातीच्या बाजूला धारधार शस्त्राने वार करून, मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले.

काय आहे हत्येचे कारण...
सोपान कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २०२१ मध्ये कोरोना काळात भरत पाटील याने आपले परमिट रूम व बीअर बार शासनाने निश्चित करून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ सुरू ठेवले होते. युवराज कोळी त्यावेळेस २ शेळगाव-कानसवाडा या ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच असल्याने भरत पाटील याला शासनाने निश्चित करून दिलेल्या वेळेतच व्यवसाय करण्यास सांगितले होते. तेव्हापासून भरत पाटील व त्याची मुले युवराज कोळी यांच्याशी ग्रामपंचायतीच्या मुद्द्यावरून भांडत होती. गुरुवारी रात्रीही काहीही कारण नसताना, भरत पाटील याने युवराज कोळी यांना ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात काय विकास केला, याचा जाब विचारत शिवीगाळ केल्याचे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी शेतात येऊन संगनमताने भरत पाटील, परेश पाटील व देवेंद्र पाटील यांनी मुलाची हत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Young boy stabbed to death in front of parents incident in jalgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.