जळगावात बस पोर्टचे काम वर्षभरात पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 12:59 IST2018-08-31T12:57:42+5:302018-08-31T12:59:02+5:30
एसटीचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांची माहिती

जळगावात बस पोर्टचे काम वर्षभरात पूर्ण होणार
जळगाव : जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या बसपोर्टसाठी महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होईल व त्यानंतर काम हाती घेवून साधारणत: वर्षभरात ते पूर्ण करण्यात येईल,अशी माहिती राज्यपरिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी दिली. या सोबतच जिल्ह्यातील आगारांसाठी प्रस्तावित असलेल्या विविध कामांसह प्रवासी सुरक्षिततेला महत्त्व देत तयार करण्यात आलेल्या लोखंडी बनावटीच्या (एम.एस.) २० बसेस् दाखल झाल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘लोकमत’ कार्यालयास त्यांनी गुरुवारी सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचेस्वागत केले.
‘बसपोर्ट’साठी महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होणार
देवरे म्हणाले, राज्यातील १३ बसस्थानकांवर बसपोर्ट उभारणीसाठी मंजुरी मिळाली असून त्यात जळगाव नवीन बसस्थानकाचाही समावेश आहे. मात्र निविदा प्रक्रियेत अडचणी आल्याने हे काम रखडले. मात्र आता महिनाभरात पुन्हा नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन वर्षभरात या कामास सुरुवात होणार आहे. यामध्ये अत्याधुनिक सुविधा असतील. त्यात थिएटर, प्रवाशांसाठी वातानुकुलीत खोल्या, स्वच्छतागृहे, चालक-वाहकांसाठी विश्रामगृह अशा एकाहून एक दर्जेदार व आधुनिक सुविधा राहणार आहेत.
आरामदायी प्रवासासाठी शिवशाही
प्रवाशांना आरामदायी प्रवासाची अनुभूती देणाºया शिवशाही बसेस्ला चांगला प्रतिसाद मिळत असून प्रासंगिक करारसाठीदेखील त्यांना मागणी असल्याचे देवरे यांनी सांगितले. सध्या जळगावात १४ बसेस् असून त्यात आणखी ३० बसेस्ची भर पडणार आहे. चालकांना या बसचे प्रशिक्षण देताना त्यात पॉवर स्टेअरिंग व एअर सस्पेंशन यांच्या ताळमेळबाबत माहिती न मिळाल्याने चालकांना अडचणी येत असल्याचेही त्यांनी मान्य केले. मात्र सुदैवाने जळगाव विभागात यामुळे अपघात झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाडे कमी करणे अशक्य, तरी चांगला प्रतिसाद
जळगावातून पुण्याला जाणाºया प्रवाशांचा ओढा पाहता पुण्यासाठीदेखील स्लीपर कोच सेवा सुरू करण्यात आली असल्याचे देवरे म्हणाले. खाजगी बस मालक हंगाम नसताना (आॅफ सिझन) भाडे कमी करतात, मात्र आम्हाला बंधने असल्याने आम्ही ते कमी करू शकत नाही. तरीदेखील त्यांच्याशी स्पर्धा करीत आमच्या बसेस्ला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे देवरे म्हणाले. ‘शिवशाही’मध्ये आता ज्येष्ठ नागरिकांनाही सवलत दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
नाशिक प्रवासात वाचणार एक तास
जळगावातून नाशिकला जाणाºया प्रवाशांची संख्या मोठी असल्याने जळगावातून धुळे, मालेगावमार्गे न जाता पारोळ््यानंतर आर्वीमार्गे नवीन पर्यायी मार्गावरून सेवा सुरू करण्याचा विचार असल्याचे देवरे यांनी सांगितले. यासाठी या मार्गाचे सर्वेक्षणदेखील केले, मात्र १० कि.मी.चा रस्ता खराब असल्याने हे काम थांबले आहे. नाशिकसाठी या मार्गावरून बससेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा किमान एक तास वाचणार असल्याचे देवरे म्हणाले. ते शक्य न झाल्यास धुळे येथून बायपासचा पर्यायही असल्याचे ते म्हणाले.
खराब रस्त्यामुळे सेवा थांबवावी लागते
जिह्यातील अनेक गावांकडे जाणाºया रस्त्यांची दुरवस्था असून त्यामुळे त्या मार्गांवर बसफेºया थांबवाव्या लागतात. या बाबत मात्र रस्ते चांगले असल्याचे दाखले संबंधित विभागाकडून दिले जातात व लोकप्रतिनिधी आम्हाला बसफेºयांबाबत विचारणा करतात. मात्र प्रत्यक्षात रस्तेच चांगले नसल्याने बस पाठविणे शक्य होत नसल्याचे ते म्हणाले.
बस कमी असल्याने विद्यार्थ्यांची अडचण
विविध गावातील विद्यार्थी बससाठी आंदोलन करीत असल्याने त्याबाबत देवरे म्हणाले की, खराब बसेस् दुरुस्तीसाठी काढण्यात आल्याने बसेस्ची संख्या कमी आहे, त्यामुळे या अडचणी येत असल्याचे देवरे यांनी स्पष्ट केले.
एकाच दिवसात उत्पन्न एक कोटीवर
रक्षाबंधन निमित्त २५ हजार कि.मी.च्या फेºया वाढविण्यात आल्याने जळगाव विभागाला एकाच दिवसात एक कोटी आठ लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती देवरे यांनी दिली.
तात्पुरत्या दुरुस्तीसाठी २० लाख मंजूर
जळगाव बसस्थानकाची दुरवस्था झाली असून येथील तात्पुरत्या दुरुस्तीसाठी २० लाख रुपये मंजूर असून दोन महिन्यात हे काम सुरू करण्यात येणार असल्याचे देवरे यांनी सांगितले. या सोबतच स्थानकासमोरील सर्व अडथळे काढणार असल्याचे ते म्हणाले. जळगाव स्थानकासह जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये कर्मचाºयांसाठी थंड व शुद्ध (आरओ) पाण्याची सोय असण्यासह त्यांच्यासाठी सुसज्ज विश्रामगृह राहणार असल्याचेही देवरे म्हणाले.
मांडळ येथे बस जळण्याच्या प्रकारानंतर तेथे पुन्हा मुक्कामी बससेवा सुरू करण्यात आल्याचे देवरे यांनी सांगितले. जिल्ह्यात २५६ मुक्कामी बसेस आहेत.
सध्या चालकांची ११० तर वाहकांची ४०० पदे रिक्त असून ही भरती झाल्यानंतर आणखी चांगली सेवा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विजयादशमीपासून शहर बस सेवा
जळगाव शहर बस सेवेबाबत बोलताना देवरे म्हणाले की, ही सेवा परवडत नसल्याने राज्यातील इतर शहरांमध्येदखील ती बंद पडली आहे. जळगावात ही सेवा द्यायची असून त्यासाठी नियोजनदेखील करण्यात आले आहे. मात्र ती केवळ शहर बस सेवा न ठेवता त्यासाठी ग्रामीण भागातील गावांची निवड करून दोन गावे जोडण्यात येऊन शहराच्या चारही बाजूला त्यातून सेवा देण्यात येणार आहे. मात्र आता १०० बसेस् दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्या असून त्या दाखल झाल्या की विजयादशमीपासून (दसरा) ही सेवा सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. नादुरुस्त बसेस्च्या कामांना प्राधान्य असून यापुढे एकही गळकी अथवा खिळखिळी बस दिसणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
शिवशाहीची सक्ती नाही
धुळे येथे जाण्यासाठी शिवाशाहीची सक्ती नसून बस दुरुस्त होऊन आल्यानंतर दोन साध्या बस व त्यानंतर एक शिवशाही अशी सेवा सेवा सुरु करण्यात आल्याचे देवरे म्हणाले.
भुसावळला एसटी उभारणार नवीन स्थानक
भुसावळ बसस्थानकाचा प्रश्न पाहता रेल्वे प्रशासन सध्याच्या बसस्थानकाच्या समोर असलेली जागा देण्यास तयार असून तेथे परिवहन महामंडळ स्वत: नवीन स्थानक उभारणार असल्याचीही माहिती राजेंद्र देवरे यांनी दिली. या सोबतच जिल्ह्यातील रावेर, पाचोरा, चाळीसगावसह इतरही स्थानकांवर सुधारणा करण्यात येणार आहेत. यामध्ये चाळीसगाव स्थानकातील कॉंक्रीटीकरणाचा प्रस्तावदेखील तयार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.
जळगाव, भुसावळात छोटे स्थानक विचाराधीन
जळगाव, भुसावळ येथे बाहेरगावी जाणाºया बसेस्ला बसस्थानकावर येताना व पुन्हा बाहेर पडताना मोठा वेळ खर्ची होतो. त्यासाठी महामार्गावर अथवा सोयीच्या ठिकाणी छोटे स्थानके उभारुन प्रवाशांचा वेळ वाचविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे देवरे म्हणाले.
आठवडाभरात तीन मार्गांवर नवीन ‘लालपरी’
सध्याच्या बसेस् अल्युमिनियमपासून तयार केलेल्या असून अपघात झाल्यास बसचा चुराडा होऊन प्रवाशांच्याही जीवावर बेतते. त्यामुळे आता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी बनावटीच्या बसेस तयार करण्यात आल्या असून अपघात झाला तरी त्यात प्रवाशी सुरक्षित राहतील, असे देवरे म्हणाले. या नवीन ‘लालपरी’ २० बस जळगावात दाखल झाल्या असून त्या पुढील आठवड्यापासून धुळे, औरंगाबाद, चोपडा मार्गावर सुरू करण्यात येणार आहे.