बबन हरण धर...!
बबन हरण धर...!
हा किस्सा आहे एका नगरपालिकेचा. तिथे काही जणांची एक टीम जमायची. रोजचा खाण्या-पिण्याचा खर्च काढण्यासाठी ही टीम काही ना काही युक्त्या व क्लृप्त्या करीत असे. त्यात खासकरून दुकान व घरे या संदर्भात अतिक्रमण केल्याच्या निनावी तक्रारी ही मंडळी करायची. त्या अनुषंगाने संबंधिताना नोटीस निघायची. ज्याला नोटीस मिळायची तो घाबरून पालिकेत यायचा. ही मंडळी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पालिकेत बसून असायची. घाबरलेला व्यापारी किंवा नागरिक सुरुवातीलाच काउंटरला चौकशी करायचा. त्या काउंटरवर या टीमचा खास हस्तक कर्मचारी होता. जो व्यापारी किंवा नागरिक त्याला तक्रारीचा कागद दाखवत विचारणा करायचा. हे पाहताच ज्या नगरसेवकाने ती तक्रार केलेली असायची तो सांकेतिक शब्दात म्हणायचा , ‘.. हरण धर..!’ खरे तर ही ओळ फार पूर्वी प्राथमिक शाळांमध्ये बालभारतीच्या पुस्तकात होती. त्याच ओळीचा ते अशा पद्धतीने सांकेतिक सदुपयोग करायचे. टीमचा पंटर त्या व्यापारी किंवा नागरिकाला अधिक घाबरवून ज्याने तक्रार केलेली असायची त्याला भेटायला सांगायचा. मात्र तो हे कधीही सांगत नसे की ही तक्रार त्यानेच निनावी तक्रार केलेली आहे. म्हणजेच जो शिकार करायचा त्यालाच त्या शिकारीचा लाभ मिळायचा. संबंधित टीम व्यापारी किंवा नागरिकाला मदत करायचा आव आणून प्रकरण रफा-दफा करीत असे. शिकार कोणीही केलेली असली तरी सायंकाळी पार्टी मात्र पूर्ण टीमला मिळायची हे विशेष...!
डिंगबर महाले