जळगाव : शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जोशी पेठेतील तीन मजली इमारतीची भिंत कोसळल्याची घटना शनिवारी मध्यरात्री १ वाजता घडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, भिंत एका घरावर कोसळल्यामुळे घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जोशी पेठ येथे गबाशेठ लहानू वाणी यांच्या मालकीची तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर त्यांचे नातू मणिकांत पुंडलिक वाणी हे वास्तव्यास आहे. दुसऱ्या मजल्यावर नंदकिशोर वाणी व पद्माकर वाणी यांचे गोडावून आहे. दरम्यान, शनिवारी रात्री दहा वाजेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल तीन ते चार तास मुसळधार पाऊस सुरू होता. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अचानक मणिकांत यांच्या खोलीच्या शेजारी असलेल्या एका खोलीची भिंत पावसामुळे कोसळली. भिंत कोसळताच, मोठा आवाज झाला आणि मणिकांत यांना जाग आली. त्यांना भिंत कोसळल्याचे लक्षात आल्यानंतर रात्री दुसरीकडे त्यांनी स्थलांतर केले.
घरावर कोसळली भिंत
तीन मजली इमारतीची भिंत ही संतोष उर्फ उमाकांत वसंतराव बाविस्कर यांच्या मालकीच्या घरावर कोसळली. सुदैवाने हे घर खाली होते. त्या ठिकाणी वास्तव्य नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु कोसळलेल्या भिंतीच्या मलब्यात घर दबले गेले व मोठे नुकसान झाले. सकाळी घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच तीन मजली इमारत ही सव्वाशे ते दीडशे वर्षे जुनी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.