विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, जळगाव जिल्ह्यात पहिली आणि आठवची पाठ्यपुस्तके दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 12:50 IST2018-06-29T12:49:14+5:302018-06-29T12:50:25+5:30
शुक्रवार पासून वितरण सुरु

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, जळगाव जिल्ह्यात पहिली आणि आठवची पाठ्यपुस्तके दाखल
जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि. जळगाव : शाळा प्रवेशोत्सवाची सुरुवातच १५ जून रोजी नव्या पाठ्यपुस्तकांचे वितरण करुन झाली होती. मात्र यंदा इयत्ता पहिली आणि आठवीचा पाठ्यक्रम बदलल्याने ही पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी उपलब्ध होऊ शकली नव्हती. तेरा दिवसांनी म्हणजेच बुधवारी जिल्ह्यात दाखल झाली असून शुक्रवारपासून त्याचे वितरण तालुकास्तरावरुन गटशिक्षण कार्यालयाकडून सुरु झाले आहे.
सर्व शिक्षा अभियानर्तंत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके मोफत दिली जातात. दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्या पुस्तकांच्या संचाचे वितरण केले जाते. यंदाही दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली गेली.
पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रम बदलल्याने ही पाठ्यपुस्तके उशिरा दाखल झाली आहे.
उर्दू आणि सेमी इंग्रजी अभ्यासक्रमाचीदेखील पुस्तके उपलब्ध झाली आहेत. शाळांना पुस्तके घेऊन जाण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.
चाळीसगाव तालुक्यात १४ हजार विद्यार्थी
चाळीसगाव तालुक्यात पहिली आणि आठवीच्या १४ हजार ६५६ विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जाणार आहेत. इयत्ता पहिलीतील उर्दू माध्यमातील २९१ आणि मराठीसह सेमी इंग्रजी माध्यमातील सहा हजार २९१ तर आठवीच्या उर्दू माध्यमातील ३८५ तसेच मराठीसह सेमी इंग्रजीच्या सात हजार २८२ अशा सात हजार ६६७ विद्यार्थ्यांना येत्या दोन ते तीन दिवसात पाठ्यपुस्तके मिळतील.
स्मार्ट फोनवरही पुस्तके उपलब्ध
यावर्षी प्रथमच बालभारतीने डिजिटल टेक्नोव्ह?सी पर्याय देखील उपलब्ध करुन दिल्याने स्मार्ट फोनवरही पाठ्यपुस्तके पाहता येऊ शकतात. यासाठी ‘दिक्षा’ अॅपची निर्मिती केली गेली आहे. पाठ्यपुस्तकाच्या प्रत्येक पानावर याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पहिल्या पृष्ठावरील क्यु.आर.कोड व्दारे डिजिटल पाठ्यपुस्तक तसेच पाठ्यपुस्तकातील आशयाच्या अनुषंगाने अन्य अध्ययन - अध्यापनसाठी उपयुक्त दृक-श्राव्य साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांसह पालकांनाही होणार आहे.
पहिली व आठवीची उर्दूसह मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाची पाठ्यपुस्तके तीन दिवसांपूर्वी उपलब्ध झाली आहेत. एकही विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित राहणार नाही. याची खबरदारी घेतली आहे.
- सचिन परदेशी, गटशिक्षणाधिकारी, चाळीसगाव.