संजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : कोरोनाच्या काळात मृत्यूचा उच्चांक गाठल्यानंतर आता वातावरणात बदल झाल्याने गेल्या महिन्याभरापासून अमळनेर तालुका डेंग्यू, मलेरिया, व्हायरल विषाणूच्या आजाराने आजारी पडलाय. हजारो रुग्ण उपचार घेत असून खासगी दवाखाने देखील फुल्ल झाले आहेत.
कोरोनाच्या काळात अमळनेर तालुक्यात मृत्यूचे प्रमाण जास्त होते आणि त्याच वेगाने ते कमीही झाले. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पळ काढल्यासारखी परिस्थिती आली खरी. मात्र, अचानक व्हायरल इन्फेक्शनने जोरदार मुसंडी मारल्याने प्रत्येक घरात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण आहेत. अंगदुखी, आवाज बसणे आदींनी नागरिक त्रस्त आहेत. किमान पाच ते सहा दिवस प्रत्येकाला त्रास होत आहे. लहान मुलांचेही प्रमाण वाढले आहे. उपचार करणारे काही डॉक्टर आणि आशा, आरोग्य सेवक देखील व्हायरल विषाणूने आजारी आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सततचा पाऊस, ठिकठिकाणी डबके साचल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यू , मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यात कोरोनाचे रुग्ण नाहीत म्हणून नागरिकांनी मास्क, गर्दीचे निर्बंध पाळणे बंद केल्याने व्हायरल विषाणूमुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात देखील रुग्ण वाढले आहेत. पाण्याचे डबके साचलेले असून पाणी जिरत नाही तोच पुन्हा पाऊस पडत आहे.
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने बाहेरील खाद्यपदार्थ खायची आवड निर्माण झाली आणि या दिवसात पचनशक्ती कमी झाल्याने टायफाॅईडसारखे आजार देखील वाढत आहेत.
ज्याप्रमाणे सात्री गावात जवळपास सर्वच आजारी होते तशी परिस्थिती अनेक गावांत निर्माण झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी दवाखाने यांच्यात गर्दी वाढली आहे. ग्रामीण रुग्णालयात देखील सरासरी १५० रुग्ण तपासायला येत आहेत, तर अनेकजणांना ॲडमिट देखील करावे लागत असल्याचे अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे यांनी सांगितले.
मास्क आणि सोशल डिस्टन्स यांचे पालन करावे आणि प्रतिकारशक्ती वाढवावी हाच बचावाचा सर्वोत्तम पर्याय आहे. नियम पाळले तरच सुरक्षित राहू शकतो. -डॉ. प्राजक्ता व डॉ निखिल बहुगुणे, अमळनेर.
४० टक्के डेंग्यूसदृश व ६० टक्के व्हायरल विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. गरम पाणी पिणे, स्वछता पाळून डासांपासून स्वतःचे रक्षण करावे - डॉ. नितीन पाटील, बालरोगतज्ज्ञ, अमळनेर.
जलरक्षकांना सूचना देऊन पाण्याचे स्रोतांचे सुपर क्लोरिनेशन करायला सांगितले आहे. आशा, परिचारिका, आरोग्य सेवक यांना कंटेनर सर्वेक्षण व रक्त तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. - डॉ. गिरीश गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी, अमळनेर.
नगरपालिकेने डासांच्या औषधांची फवारणी करावी, पावडर फवारणी करून तत्काळ पाण्याचा निचरा करावा- शीतल महेंद्र पाटील, नागरिक.