उपराष्ट्रपती राधाकृष्णन अजिंठा लेणीला देणार भेट, वेरुळसह त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 18:56 IST2025-12-29T18:54:06+5:302025-12-29T18:56:37+5:30
Vice President C.P. Radhakrishnan: उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन रविवारी सकाळी जळगावात दाखल होणार आहेत. दोन तासांच्या विश्रांतीनंतर ते अजिंठा लेणीकडे प्रयाण करणार आहेत. लेण्यांची पाहणी केल्यानंतर ते छ.संभाजीनगर येथे मुक्कामी थांबणार असल्याचा प्राथमिक दौरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

उपराष्ट्रपती राधाकृष्णन अजिंठा लेणीला देणार भेट, वेरुळसह त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाणार
- कुंदन पाटील
जळगाव - उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन रविवारी सकाळी जळगावात दाखल होणार आहेत. दोन तासांच्या विश्रांतीनंतर ते अजिंठा लेणीकडे प्रयाण करणार आहेत. लेण्यांची पाहणी केल्यानंतर ते छ.संभाजीनगर येथे मुक्कामी थांबणार असल्याचा प्राथमिक दौरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
देशाचे १५ वे उपराष्ट्रपती राधाकृष्णन यापूर्वी राज्यपाल असताना जळगाव दौऱ्यावर आले होते. दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांनी जनभावना ऐकून घेतली होती. उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच दाखल होणार आहेत.
असा आहे दौरा
नवीदिल्लीहून दि.३ रोजी दुपारी ४.५५ वाजता ते राजधानी एक्स्प्रेसने जळगावकडे निघतील. दुसऱ्यादिवशी (दि.४) सकाळी ६ वाजता जळगावात दाखल झाल्यानंतर ते अजिंठा विश्रामगृहावर जातील. दीड तासांच्या मुक्कामानंतर रविवारी सकाळी १० वाजता ते अजिंठ्याकडे रवाना होतील. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत लेण्यांची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी ४ वाजता ते छ.संभाजीनगरकडे रवाना होतील. सायंकाळी ६ वाजता सुभेदारी विश्रामगृहात मुक्काम केल्यानंतर दि.५ रोजी सकाळी वेरूळ लेण्यांच्या परिसरातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी ४ वाजता ते नाशिककडे रवाना होतील. नाशिक रोडवरच्या सेक्यिरिटी प्रेसच्या विश्रामगृहात ते मुक्काम करतील. त्यानंतर दि.६ रोजी त्र्यंबकेश्वरकडे सकाळी ८ वाजता रवाना होतील. दर्शनानंतर ते भिमाशंकरकडे (पुणे) रवाना होतील. भिमाशंकर येथे मुक्कामी थांबणार असून दि.७ रोजी पुण्याहून विमानाने नवीदिल्लीकडे रवाना होणार आहेत.