पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

By Admin | Updated: April 29, 2017 18:27 IST2017-04-29T18:27:06+5:302017-04-29T18:27:06+5:30

गावातील दोन तरुणांचा अंत झाल्याने कुसुंबा गावावर शोककळा पसरली आहे

Two young men drowning swim have died | पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

ऑनलाइन लोकमत

कुसुंबा, जि. धुळे, दि. 29 -  धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील पांझरा नदी नजीक असलेल्या  पाणीपुरवठाच्या विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या धर्मराज सुरेश शिंदे (वय 21, रा. कुसुंबा ) व कमलेश पंडित चौधरी (21, कुसुंबा) या  तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली.  या घटनेत गावातील दोन तरुणांचा अंत झाल्याने कुसुंबा गावावर शोककळा पसरली आहे.
कुसुंबा गावातून गेलेल्या पांझरा नदी पात्रात मेहेरगावला पाणीपुरवठा करणारी 50 फूट खोल विहीर आहे. शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास 20 ते 25 तरुण या विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. त्याचवेळी धर्मराज शिंदे  व कमलेश चौधरी या तरुणांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ते दोघे बुडत असताना तेथे पोहण्यासाठी गेलेली मुले घाबरून सैरावरा धावत पळून गेली.
ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विहिरीकडे धाव घेतली. तेव्हा विहिरीच्या बाजूला दोन मुलांचे कपडे पडले होते. तत्काळ ग्रामस्थांनी आपत्कालीन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर आपत्कालीन विभागाची टिम घटनास्थळी दाखल झाली. दोघांचे मृतदेह सायंकाळी साडेपाच वाजेनंतर बाहेर काढण्यात  यश आले.
धर्मराज व कमलेश यांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी दिली. 

Web Title: Two young men drowning swim have died