जामनेरला दुमजली इमारत कोसळली, दोन महिला जखमी; सुदैवाने जिवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 23:00 IST2022-12-22T22:59:13+5:302022-12-22T23:00:20+5:30
मौलाना हाफीज करीम यांच्या मालकीचे हे घर आहे. ते त्यांनी भाड्याने दिले आहे.

जामनेरला दुमजली इमारत कोसळली, दोन महिला जखमी; सुदैवाने जिवितहानी टळली
- मोहन सारस्वत
जामनेर जि. जळगाव : श्रीराम पेठ भागातील जुनी दुमजली इमारत अचानक कोसळली. पहिल्या मजल्यावर राहत असलेल्या दोन महिला जखमी झाल्या. तळमजल्यावरील रहिवासी बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
मौलाना हाफीज करीम यांच्या मालकीचे हे घर आहे. ते त्यांनी भाड्याने दिले आहे. जीर्ण घराच्या भिंती देखील पडाऊ झाल्या होत्या. रात्री अचानक मोठा आवाज झाल्याने जवळपासच्या रहिवाशांनी बाहेर धाव घेतली. पहिल्या मजल्यावर राहत असलेल्या मुमताजबी शेख शकील (५२) या मातीच्या ढिगाऱ्यात खाली पडल्या. जवळच्या तरुणांनी त्यांना बाहेर काढले. नवेद काझी (४३) हे जवळ होते, त्यांना देखील किरकोळ मार लागला आहे. मुमताजबी यांचे कमरेचे हाड मोडले आहे. त्यांना जळगावच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण शिंदे, तहसीलदार अरुण शेवाळे व नगरसेवकांनी मदतकार्य केले. सुदैवाने तळमजल्यावर कोणीही नसल्याने अनर्थ टळला. घराचा समोरील भाग विजेच्या खांबावर पडल्याने तारा तुटल्या. प्रसंगावधान राखत तातडीने वीज पुरवठा बंद करण्यात आला.