कीर्तन सोहळ्यात पोलीस निरीक्षकाची दादागिरी; कीर्तनकारासह वारकऱ्यांना मारहाण करण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 04:37 PM2022-04-28T16:37:15+5:302022-04-28T16:41:10+5:30

चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग नगरात दरवर्षी प्रमाणे यंदाही सप्तशृंगी मातेच्या वर्धापन दिनानिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सातव्या दिवशी सोमनाथ महाराज जपे यांची कीर्तनसेवा होती.

The police inspector stopped the kirtan program; Threatened to beat Warkaris including kirtankara | कीर्तन सोहळ्यात पोलीस निरीक्षकाची दादागिरी; कीर्तनकारासह वारकऱ्यांना मारहाण करण्याची दिली धमकी

कीर्तन सोहळ्यात पोलीस निरीक्षकाची दादागिरी; कीर्तनकारासह वारकऱ्यांना मारहाण करण्याची दिली धमकी

googlenewsNext

प्रशांत भदाणे -

जळगाव - एका कीर्तन सोहळ्यात पोलीस निरीक्षकाने दबंगगिरी केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात घडला आहे. पोलीस निरीक्षकाने वारकऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही, तर वारकरी संप्रदायात कीर्तनकार ज्या जागेवर उभे राहून विवेचन करतात, त्याला नारदाची गादी म्हटले जाते, पोलीस निरीक्षक महोदयांनी या मानाच्या गादीचाही अपमान केला आहे. पायात बूट घालून ते गादीवर उभे राहिले. त्यांनी कीर्तनकारासह वारकऱ्यांना मारहाण करण्याची धमकीही दिली. यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग नगरात दरवर्षी प्रमाणे यंदाही सप्तशृंगी मातेच्या वर्धापन दिनानिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सातव्या दिवशी सोमनाथ महाराज जपे यांची कीर्तनसेवा होती. कीर्तन सुरू असताना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील हे त्याठिकाणी आले. त्यांनी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून नियमावलीचे कारण देत वारकऱ्यांशी अरेरावी केली. ते एव्हढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी वारकऱ्यांना मारहाण करण्याची धमकीही दिली, असा आरोप वारकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, या साऱ्या प्रकरणात पोलीस निरीक्षकांची बाजू मात्र, समोर आलेली नाही.

या घटनेचा वारकरी संप्रदायाने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असून, त्यांनी माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये एका व्यक्तीने पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी छोटा स्पीकर लावला, म्हणून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आता चाळीसगावात पोलीस निरीक्षकाने वारकऱ्यांना दमदाटी केली. या दोन्ही घटनांमधून पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे, हे मात्र नक्की. दरम्यान, या प्रकरणात आता पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Web Title: The police inspector stopped the kirtan program; Threatened to beat Warkaris including kirtankara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.