लग्न ठरलं, पण काही तासातच तरुणाचा एसटी अपघातात मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 18:54 IST2022-07-18T18:52:59+5:302022-07-18T18:54:24+5:30
ST Bus Accident in Madhya Pradesh: या अपघातामुळे काहींचे संसार उघड्यावर आले तर काहींच्या भावी आयुष्याच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.

लग्न ठरलं, पण काही तासातच तरुणाचा एसटी अपघातात मृत्यू!
- प्रशांत भदाणे
जळगाव : मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे मोठा अपघात झाला. महाराष्ट्राची एसटी बस इंदूरहून अमळनेरकडे येत होती, यावेळी ती पुलावरून नर्मदा नदीपात्रात कोसळली. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मध्यप्रदेशात झालेल्या एसटीअपघातामुळेजळगाव जिल्ह्यावर एकच शोककळा पसरली आहे. या अपघातात एसटी बस चालक आणि वाहकासोबत खान्देशातील ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे काहींचे संसार उघड्यावर आले तर काहींच्या भावी आयुष्याच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.
या अपघातात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेल्या पाडळसरे गावातील अविनाश संजय परदेशी या 25 वर्षीय तरुणाचाही मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी अविनाश मुलगी पाहायला इंदूरला गेला होता, त्याला मुलगी पसंतही पडली होती. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अविनाशने लहान भावाचा वाढदिवस साजरा केला. आनंदाचे क्षण साजरे केल्यानंतर काही तास उलटत नाही तोच अविनाशचा एसटी बस अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
अविनाशच्या कुटुंबाची कथा हृदय हेलवणारी आहे, त्याचं कुटुंब मूळचं नाशिकचं, पण वडील नसल्याने तो आईसह मामांच्या गावी पाडळसरे इथं राहत होता. कपड्यांना इस्त्री करायचा व्यवसाय करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याचा लहान भाऊ इंदूरला मावशीकडे असतो. याच भावाचा वाढदिवस आणि मुलगी पाहण्यासाठी तो इंदूरला गेला होता. सर्व काही सुरळीत सुरू असताना नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं. एसटी बसच्या अपघातात नियतीनं अविनाशला हिरावून नेलं. मनमिळावू स्वभाव असलेल्या अविनाशच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.