मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 06:07 IST2025-08-21T06:06:57+5:302025-08-21T06:07:42+5:30
शेतीला घातलेल्या तारेच्या कुंपणाला विजेचा करंट देणे पाच जणांच्या जिवावर बेतले

मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क, एरंडोल (जि. जळगाव) : शेतातील मका पिकाचे रानडुकरांपासून संरक्षण व्हावे, यासाठी शेतीला घातलेल्या तारेच्या कुंपणाला विजेचा करंट देणे पाच जणांच्या जिवावर बेतले. मृतांमध्ये आई, मुलगा, सून आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. यात एक वर्षाची बालिका आश्चर्यकारकरीत्या बचावली आहे. ही हृदयद्रावक घटना वरखेडी येथील एका शेतात बुधवारी उघडकीस आली.
विकास रामलाल पावरा (वय ३५), त्याची पत्नी सुमन (३०), मुले पवन (४), कवल (३) आणि विकास याची सासू (सर्व रा. ओसरणी, जि. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.
वरखेडी येथील शेतकरी बंडू युवराज पाटील (६४) यांनी आपल्या शेतात मका पेरला आहे. रात्री-अपरात्री रानडुकरे पिके नष्ट करीत असल्याने त्यांनी शेतीला तारेचे कुंपण केले असून, या तारांमध्ये वीज प्रवाह सोडला होता. विकास पावरा हा परिवारासह मंगळवारी रात्री या शेताच्या बाजूला असलेल्या पायवाटेने जात होता. त्याचवेळी या तारेच्या कुंपणाला त्याचा स्पर्श झाल्याने पाचही जणांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला.
शेतमालक बंडू पाटील हे सकाळी शेतात गेले असता त्यांना हे हृदयद्रावक दृश्य दिसले. त्यांनी तत्काळ एरंडोल पोलिसांना याची माहिती दिली.
...अन् बालिका बचावली
या हृदयद्रावक घटनेत दुर्गा विकास पावरा ही एक वर्षाची बालिका आश्चर्यकारकरीत्या बचावली. सकाळी शेतमालकाला ती मृतदेहांच्या बाजूलाच बसून रडताना आढळली. यानंतर पोलिसांनी या बालिकेला जिल्हा रुग्णालयात नेल्याची माहिती मिळाली.