Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 17:36 IST2025-05-09T17:30:53+5:302025-05-09T17:36:28+5:30
Tipper Hits Bike In Jalgaon: भरधाव टिप्परने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
नानासाहेब कांडलकर, लोकमत न्यूज नेटवर्क:जळगाव जामोद तालुक्यातील माऊली फाटा येथे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता भीषण अपघात झाला. भरधाव टिप्परने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दोन चिमुकल्या नातवंडांचा जागीच मृत्यू झाला. तर, आजी-आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी टिप्पर जाळून टाकल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रकाश महादेव खेडकर (६०) आणि साधना प्रकाश खेडकर (५५), रा. पळशी सुपो, ता. जळगाव जामोद हे आपल्या दोन नातवंडांना घेऊन मोटरसायकलवरून शेगावकडे जात होते. माऊली फाट्यानजीक भरधाव वेगाने आलेल्या टिप्पर (क्र. एमएम-२८-बीबी-८४८९) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात पार्थ अक्षय चोपडे (६), रा. राजापेठ, अमरावती आणि युवराज मोहन भागवत (५), रा. बडनेरा, अमरावती हे दोघे बालक जागीच ठार झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने टिप्परला आग लावली. या आगीत टिप्परचे टायर जळून खाक झाले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक श्रीकांत निचळ, उपनिरीक्षक नारायण सरकटे, राजकुमार कांबळे यांनी पोलीस बंदोबस्तासह तातडीने धाव घेतली. अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी घटनास्थळी पाहणी केली. जखमींना प्रथम ग्रामीण रुग्णालय, जळगाव जामोद येथे दाखल करण्यात आले. गंभीर जखमी आजीला खामगाव सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. या प्रकरणात टिप्पर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी चालकास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरसीपी पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी पाचारण केले होते. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.