भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवा, जरा कडक भूमिका घ्या; खडसे यांचे दिलीप वळसे-पाटलांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 13:33 IST2022-04-15T13:17:31+5:302022-04-15T13:33:29+5:30
सत्य बाहेर आणले पाहिजे आणि दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवा, जरा कडक भूमिका घ्या; खडसे यांचे दिलीप वळसे-पाटलांना आवाहन
जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र बदलणारा नेते आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, कोणी पहिलवान बाकी नाही. पण शरद पवारांनी एका रात्रीत चित्र बदललं, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
मला स्वप्नांतही वाटत नव्हतं की, हे तीन पक्ष एकत्र येतील. पण त्यांनी करून दाखवलं, असंही एकनाथ खडसे म्हणाले. शरद पवार हे कार्यकर्त्यांना मोठे करणारे, त्यांच्याशी जवळीकता जोपासणारे नेते आहेत. गेल्या अर्धशतकातील राजकारणावर त्यांचा ठसा असून राजकारणाची दिशा बदलण्याचे काम त्यांनी केलं आहे, असं कौतुक एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
काहीतरी करून मला अडकवण्याचा प्रयत्न केला. जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. 'हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डुबेंगे' असं एकनाथ खडसे म्हणाले. सत्य बाहेर आणले पाहिजे आणि दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, असंही ते म्हणाले. शरद पवार हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत, असंही एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं.
स्वतंत्रसेनानी आणि माजी आमदार स्व. मुरलीधर अण्णा पवार यांच्या धरणगाव तालुक्यातील चांडसर येथील पुतळ्याचं शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याच अनावरण झालं. यावेळी एकनाथ खडसे बोलत होते. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
गृहमंत्रीसाहेब जरा कडक भूमिका घ्या- खडसे
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जरा कडक भूमिका घेऊन भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवण्याचे आवाहन देखील एकनाथ खडसे यांनी केले आहे.