बेकायदेशीर बायोडिझेल पंपांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST2021-08-01T04:15:34+5:302021-08-01T04:15:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर : तालुक्यातील बेकायदेशीररित्या चालणाऱ्या बायोडिझेल पंपांवर तत्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी तालुक्यातील ...

बेकायदेशीर बायोडिझेल पंपांवर कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर : तालुक्यातील बेकायदेशीररित्या चालणाऱ्या बायोडिझेल पंपांवर तत्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी तालुक्यातील पंपचालकांनी केली आहे. पंपचालकांनी शनिवारी तहसीलदार श्वेता संचेती यांना निवेदन दिले.
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील चिखली गावाजवळील गजानन हॉटेलजवळ, मुक्ताई टन काटा महामार्ग, अंतुर्ली फाटा, पूर्णाड फाटा यासह विविध पाच-सहा ठिकाणी बायोडिझेलच्या नावाखाली डिझेलसदृश इंधनाची खुलेआम बेकायदेशीररित्या विक्री सुरू आहे. केंद्र सरकारच्या ३० एप्रिल २०१९ च्या अधिसूचनेनुसार राज्य शासनाने बायोडिझेल धोरण ११ मे २०१९ रोजी निश्चित केले आहे. या धोरणानुसार बायोडिझेलची १० ते २० टक्क्यांपर्यंत केवळ मिश्रण म्हणून विक्री करण्यासाठी विविध विभागांच्या परवानग्या बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत.
असे असतानादेखील कोणत्याही नियमांचे पालन न करता बेकायदेशीररित्या तालुक्यात बायोडिझेलच्या नावावर डिझेल सदृश इंधनाची विक्री केली जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून राज्य शासनास मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो. पण या बेकायदेशीर विक्रीमुळे राज्य शासनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. केवळ मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध डिझेल विक्रीमुळे राज्य शासनाचे दिवसाकाठी किमान पाच लाख रुपयांचे नुकसान होत असताना अशा बेकायदेशीर पंपांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी पेट्रोल पंपचालकांनी केली आहे.
यावेळी पेट्रोल पंपमालक व चालक गिरीश महाजन, विराज महाजन, अमित खेवलकर, अनंता भारंबे या प्रमुख मालक व चालक यांच्यासह पेट्रोल पंपचालक उपस्थित होते.