बोदवड : बोदवड येथे पशुधन चोरणाऱ्या टोळीला पकडत असताना जोरदार झटापट झाली. यावेळी झालेल्या चाकूहल्ल्यात दोन जण जखमी झाले तर दोन जणांना पकडण्यात आले. तीन जण पसार झाले आहेत. बोदवड येथे गुरुवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली.
शेख शोएब शेख उस्मान (रा. धाड, जि. बुलडाणा) व मुजफर अली अजगर अली (रा. पाळधी, ता. धरणगाव) अशी या पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. बोदवड शहरात गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर पशुधन चोरीस जात आहे. यामुळे पशुधन मालक रात्री गस्त घालत आहेत. या गस्तीदरम्यान हा थरार घडला. जामठी रस्त्यावरील बळीराजा मंगल कार्यालयाजवळ काही तरुण गस्त देत होते. त्याच वेळेस गजानन आनंदा पाटील यांच्या मालकीची गाय चोरीस गेली असल्याची माहिती या तरुणांना मिळाली. त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवली. एका दुचाकीवरून दोन तरुण तर त्यांच्या पाठीमागे आलिशान चारचाकी गाडी जात होती.
तरुणांनी दुचाकीला अडवण्याचा प्रयत्न केला असता चारचाकी वाहन त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला. या दरम्यान दुचाकीस्वार खाली पडले, त्यांना पकडण्यासाठी पाच ते सहा जण धावले त्यांनाही चारचाकी वाहनाने धडक दिली आणि वाहन भरधाव वेगाने पसार झाले.
यात शांताराम रामदास पाटील (५५ रा. जामठी दरवाजा, बोदवड) यांच्या छाती व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दुचाकीवरील एकाने चाकू मारल्याने राजू फकिरा पांचाळ (४५) यांच्या हाताला जखम झाली आहे. यावेळी झालेल्या झटापटीत दोन जणांना पकडण्यात यश आले. त्यांना रात्रीच बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर चारचाकी वाहनात यासिन इस्माईल खान (रा. मालेगाव), दानिश व समीर हे पसार झाले.
बोदवड पोलिसांच्या पथकाने सिल्लोडपर्यंत या वाहनाचा पाठलाग केला पण ते आढळले नाहीत. सचिन राजू पाटील यांच्या फिर्यादीवरून वरील सर्व पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.