सचिन देव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सद्य स्थितीला बहुतांश रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, या गाड्यांना कोरोनाच्या नावाखाली स्पेशल गाड्यांचा दर्जा देऊन, जादा भाडे आकारण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिंक भुर्दंड बसत असून, रेल्वे प्रशासनाने आता सणासुदीच्या काळात तरी स्पेशल गाड्यांद्वारे तिकिटासाठी जादा दराची आकारण्यात येणारी रक्कम थांबविण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. तसेच पूर्वीप्रमाणे गाड्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुल्या करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या अनेक महिन्यांपासून स्पेशल गाड्या चालविण्यात येत असून, या गाड्यांना जनरल तिकीट अद्यापही बंद आहे. तर आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच कोरोनापूर्वी या गाड्यांचे जे तिकीट दर होते, त्याहून काही प्रमाणात जास्त तिकिटांच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच भुर्दंड बसत आहे.
इन्फो :
सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन
हावडा एक्स्प्रेस
सेवाग्राम एक्स्प्रेस
काशी एक्स्प्रेस
कुशीनगर एक्स्प्रेस
इन्फो :
दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार
रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या आधी एक्स्प्रेसचे भाडे आणि आता या स्पेशल ट्रेनच्या भाड्यात २५ ते १०० रुपयांपर्यंत फरक आहे. यामध्ये पूर्वी जळगाव ते चाळीसगाव दरम्यान एक्स्प्रेसचे सर्वसाधारण तिकीट ५० रुपये होते. आता हे तिकीट आरक्षणामध्ये ६५ रुपये तर काही गाड्यांना ७५ रुपये आहे. जळगाव ते मुंबई तिकीट २५० ते २७५ रुपयांपर्यंत होते. आता हेच तिकीट ३८० ते ४०० रुपयांपर्यंत मिळत आहे.
इन्फो :
जनरल डबे कधी ‘अनलॉक’ होणार
रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही जनरल तिकीट सुरू केले नसून, तिकीट आरक्षित केल्यावरच प्रवासाची सक्ती केली आहे. तसेच पूर्वीच्या जनरल डब्यांना आरक्षित करून या डब्यांमध्ये सीटरचे आरक्षणाचे तिकीट देण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना रेल्वेचा प्रवास दुरापास्त झाला असून, जनरल डबे कधी ‘अनलॉक’ होणार, असा प्रश्न या प्रवाशांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
इन्फो :
‘स्पेशल’ भाडे कसे परवडणार?
कोरोनाचे कारण सांगून रेल्वे प्रशासनाने अद्यापही पॅसेंजर गाड्या सुरू केलेल्या नाहीत. तर सध्या ज्या गाड्या सुरू आहेत, त्या गाड्यांना विशेष व फेस्टिव्हल गाड्या सांगून जादा भाडे घेत आहेत. यामुळे सर्वसामान्य माणसांना हा प्रवास कसा परवडणार आहे. रेल्वेने आता तरी पूर्वीप्रमाणे गाड्या सुरू करायला हव्यात.
- तुषार देसले, प्रवासी
कोरोनाच्या नावाखाली रेल्वेकडून ज्या पद्धतीने तिकिटामागे जादा पैसे आकारात आहेत, ती लूट योग्य नाही. ज्या हेतूने जादा तिकीट आकारण्यात येत असले तरी, आरक्षित गाड्यांमध्येही प्रचंड गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कोरोनाचे कारण सांगून करण्यात येणारी लूट आता सणासुदीच्या काळात तरी थांबवायला हवी. सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणे गरजेचे आहे.
- संदीप पाटील, प्रवासी