चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 05:41 IST2025-10-20T05:40:39+5:302025-10-20T05:41:35+5:30
चांदीसाठीचा २५ हजार रुपयांवर पोहोचलेला प्रीमियम आता शून्यावर आला आहे.

चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : धनत्रयोदशीला सोने-चांदीच्या भावात घसरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी (१९ ऑक्टोबर) भाव स्थिर राहिले. आगामी काळात चांदीचे भाव एक लाख ६० ते एक लाख ७० हजार रुपयांदरम्यान राहू शकतात. मात्र, सोन्याच्या भावात तेजी राहणार असल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे. दरम्यान, चांदीसाठीचा २५ हजार रुपयांवर पोहोचलेला प्रीमियम आता शून्यावर आला आहे.
धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी सोन्याच्या भावात तीन हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३१ हजार ५०० रुपयांवर पोहोचले होते. मात्र, ऐन मुहूर्तावर सोन्याच्या भावात थेट तीन हजार रुपयांची घसरण होऊन ते एक लाख २८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. तसेच चांदीच्या भावातदेखील सात हजार रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ७१ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. रविवारी भाव स्थिर राहिले.