दारु न दिल्याने हॉटेल मालकावर गोळीबार; यावलनजीकची घटना, दोघे हल्लोखोर पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 00:22 IST2025-07-11T00:22:36+5:302025-07-11T00:22:36+5:30
दारू देण्यास नकार दिल्याने हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे.

दारु न दिल्याने हॉटेल मालकावर गोळीबार; यावलनजीकची घटना, दोघे हल्लोखोर पसार
सुधीर चौधरी
जळगाव: यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्यावर गुरुवारी रात्री ९.३० वाजता हॉटेल मालकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारू देण्यास नकार दिल्याने हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. प्रमोद श्रीराम बाविस्कर ( ५०, रा. चंदू अण्णा नगर, जळगाव) असे जखमी हॉटेल मालकाचे नाव आहे. त्यांच्या मानेला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
प्रमोद बाविस्कर गुरुवारी रात्री ९.३० वाजता आपले हॉटेल रायबा हे बंद करून जळगावला जाण्यासाठी कारमध्ये बसले. त्याच वेळी दोन जण त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी हॉटेल सुरू करून दारू देण्याची मागणी केली. बाविस्कर यांनी हॉटेल बंद झाल्याचे सांगितले. यावर संतापलेल्या हल्लेखोरांनी थेट प्रमोद बाविस्कर यांच्या दिशेने गोळीबार केला.
यात बाविस्कर यांच्या मानेला गोळी लागली आणि ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले. बाविस्कर यांचा मुलगा आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे पथकासह घटनास्थळावर पोहोचले आणि त्यांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत अज्ञातांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले होते.