उन्हामुळे जळगावातील शाळा सकाळी भरणार; सोमवारपासून होणार अंमलबजावणी

By अमित महाबळ | Published: June 18, 2023 12:50 PM2023-06-18T12:50:49+5:302023-06-18T12:52:14+5:30

जिल्ह्यात तापमान सातत्याने चाळिशीपार आहे. जून महिना पावसाचा आहे पण पहिले पंधरा दिवस उलटून गेले तरीही मान्सूनचे आगमन झालेले नाही.

schools in jalgaon will start in the morning due to heat implementation will be from monday | उन्हामुळे जळगावातील शाळा सकाळी भरणार; सोमवारपासून होणार अंमलबजावणी

उन्हामुळे जळगावातील शाळा सकाळी भरणार; सोमवारपासून होणार अंमलबजावणी

googlenewsNext

अमित महाबळ, जळगाव : जून महिना अर्धा संपला तरी मान्सूनची चिन्हे नाहीत. ऊन तर अक्षरश: आग ओकत आहे. एकूण परिस्थितीचा विचार करून शिक्षण विभागाने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे वर्ग सकाळ सत्रात भरविण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या सोमवारपासून यावर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात तापमान सातत्याने चाळिशीपार आहे. जून महिना पावसाचा आहे पण पहिले पंधरा दिवस उलटून गेले तरीही मान्सूनचे आगमन झालेले नाही. तीव्र ऊन आणि घामामुळे सगळेच हैराण झाले आहेत. प्रतिकूल वातावरण लक्षात घेता शाळांचा वेळ बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जिल्ह्यात अडीच हजारपेक्षा अधिक शाळा आहेत. वेध शाळेच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस पाऊस होण्याची शक्यता नाही. त्यामुळे उन्हाचा त्रास अधिकच वाढत जाणार आहे.

आदेशात म्हटले आहे...

उन्हामुळे सोमवार (दि.१९) पासून शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. जि. प. आणि खासगी प्राथमिक प्राथमिक शाळांची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिले आहेत तर ज्या माध्यमिक शाळा एक सत्रात भरतात त्यांची वेळ सकाळ सत्रात करण्यास माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. सर्व अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयंअर्थ सहाय्यित माध्यमिक शाळांना हा आदेश बंधनकारक आहे.

दोनच दिवसांत अनुभव, वर्गात बसणे असह्य

जि.प.च्या प्राथमिक शाळा सकाळी १०:४५ ते सायंकाळी ५ या वेळेत भरतात. आताच्या आदेशामुळे त्यांना वेळ बदलावी लागणार आहे. गुरुवारी, दि.१५ जूनला शाळेत प्रवेशोत्सव होता. शुक्रवारी, शिक्षक व विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शाळेत थांबावे लागले. परंतु, उन्हामुळे वर्गात थांबणे असह्य होत असल्याचा अनुभव सर्वांनाच आला. यानंतर शिक्षण विभागाचे शाळांची वेळ बदलण्याचे आदेश निघाले आहेत.

‘त्या’ शाळांनाही परवानगी द्या..

जिल्ह्यातील अनेक शाळा दोन सत्रात भरतात. त्यांच्याकडे जागा उपलब्ध असेल, तर त्यांना देखील सकाळच्या सत्रातच शाळा भरविण्याची परवानगी शिक्षण विभागाने द्यावी. दुपारी १२ वाजेनंतर उष्णता आणि घाम यांचा अधिक त्रास होतो. विद्यार्थ्यांना वर्गात बसणे कठीण होत आहे. शाळा संपेपर्यंत ती घामेघूम झालेली असतात. सर्वच शाळांमध्ये पुरेसे पंखे नाहीत. याचा विचार शिक्षण विभागाने करावा, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

Web Title: schools in jalgaon will start in the morning due to heat implementation will be from monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.