मतदानाआधीच सट्टा बाजारात 'निकाल'! उमेदवारांची धडधड, बुकींचेही धाबे दणाणणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 09:23 IST2026-01-13T09:23:00+5:302026-01-13T09:23:00+5:30
प्रभागनिहाय जागांवर सट्टा

मतदानाआधीच सट्टा बाजारात 'निकाल'! उमेदवारांची धडधड, बुकींचेही धाबे दणाणणार...
जळगाव : मनपाच्या ६३ जागांसाठी होणाऱ्या मतदानाला आता अवघे दोन दिवस उरले आहेत. रिंगणात असलेल्या ३२१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होण्याआधीच सट्टा बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, यंदा सट्टा बाजारात केवळ पक्षीय बहुमतावरच नाही, तर प्रभागनिहाय जागांवरही सट्टा लावला जात असल्याने चुरस अधिकच वाढली आहे.
सट्टा बाजारात केवळ महायुती किंवा महाविकास आघाडी या आघाड्यांवरच पैसे लावले जात नाहीत, तर प्रभागनिहाय कोणत्या उमेदवाराचे पारडे जड आहे, यावरही बोली लावली जात आहे.
दोन प्रकार
सट्टेबाजांच्या मते, मतदान झाल्यानंतर येणारी आकडेवारी निकालाचा अंदाज देण्यास सोपी जाते, त्यामुळे मतदानाआधी सट्टा लावण्याकडे कल दिसतोय सूत्रांच्या माहितीनुसार, यंदा जळगाव मनपा निवडणुकीसाठी दोन प्रकारात सट्टा लावला जात आहे. यातील गणिते पूर्णपणे 'जोखीम' आणि 'परतावा' यावर आधारित आहेत.
हाय रिस्कवर सर्वाधिक परतावा, मतदानानंतर चन्ना होणार कमी
मतदानापूर्वीचा 'हाय-रिस्क' सट्टा : सध्या १३ आणि १४ जानेवारी रोजी जो सट्टा लावला जात आहे, त्यावर सर्वाधिक परतावा मिळणार आहे. याचे कारण म्हणजे सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून मतदारांचा कौल स्पष्ट झालेला नाही. जोखीम जास्त असल्याने, जर लावलेला अंदाज खरा ठरला, तर सट्टा लावणाऱ्याला मिळणारी रक्कम मोठी असणार आहे.
२ मतदानानंतरचा 'टक्केवारी'प्रमाणे सट्टा : मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मतदानाच्या टक्केवारीचा अभ्यास करून पैसे लावले जातील. मात्र, कल लक्षात येत असल्याने जोखीम कमी असते, परिणामी परतावाही कमी असेल.