'मी तिथे आले ना, धिंगाणा करून ठेवेन', महिला मंत्र्याचा आरोपीला इशारा, कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 18:41 IST2025-03-02T18:37:34+5:302025-03-02T18:41:44+5:30

भाजपच्या राज्यातील एक महिला नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री यांच्या मुलीसह इतर मुलींची छेड काढल्याची घटना समोर आली. त्यानंतर मोबाईलवरून संभाषण केल्याची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे.

raksha khadse daughter molestation case Audio clip of Raksha Khadse calling and scolding Piyush More goes viral | 'मी तिथे आले ना, धिंगाणा करून ठेवेन', महिला मंत्र्याचा आरोपीला इशारा, कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय?

'मी तिथे आले ना, धिंगाणा करून ठेवेन', महिला मंत्र्याचा आरोपीला इशारा, कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय?

केंद्रीय राज्यमंत्री असलेलल्या भाजपच्या महिला नेत्याच्या मुलीसह तिच्यासोबत असलेल्या इतर मुलींची छेड काढण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या प्रकारानंतर सदर मंत्री आणि आरोपी पीयूष मोरे यांच्यात मोबाईलवरून झालेल्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात तुम्हाला आमदाराकडे जायचे की, शिंदे साहेबांकडे... मी तिथे आले तर धिंगाणा घालेन, असा इशारा मंत्र्यांनी दिला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

केंद्रीय राज्यमंत्री यांनी शिवसेनेचा पदाधिकारी पीयूष मोरे याला कॉल करून जाब विचारला आहे. या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषण वाचा...

केंद्रीय राज्यमंत्री - गावामध्ये तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी माझ्या मुलीचा व्हिडीओ काढला आणि तुम्ही त्यांना सपोर्ट करताहेत. थोडी तरी लाज वाटते का तुम्हाला?

पीयूष मोरे - व्हिडीओ वगैरे काढले नाहीत. व्हिडीओ काढल्याचा संशय आला. 

केंद्रीय राज्यमंत्री - तू ऐक जरा. तुला थोडी फार तरी वाटली पाहिजे. तुझ्या बहिणीसारखी आहे. 

पीयूष मोरे - बहिणीसारखी नाही, बहीणच आहे. 

केंद्रीय राज्यमंत्री - तू ऐकतो का जरा? तिथेच त्यांच्या थोबाड्यात लावली पाहिजे ना, दोन-तीन. 

पीयूष मोरे - बरोबर आहे ताई, पण त्याने तसं काही केलं नाही. त्याने मला तसं सांगितलं. मी पोलिसांना इतकं बोललो की, तू थेट असं का करतोय?

केंद्रीय राज्यमंत्री - तो (आरोपी) का तिथे जाऊन बसला? दोन वेळा तसं झालं ना? 

पीयूष मोरे - ताई त्याने (आरोपी) तसं काही केलं नाही आणि मी काही त्याला सपोर्ट केला नाही. 

केंद्रीय राज्यमंत्री - मी तिथे आले ना, धिंगाणा करून ठेवेन, हे लक्षात ठेवा. माझी पोरगी आहे. 

पीयूष मोरे - तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमची असली, आमची असली, तरी मुलगीच आहे. त्याबद्दल काही विषय नाही. 

केंद्रीय राज्यमंत्री - तू थोबाडीत लगावली पाहिजे की, तिथे अजून तमाशा बघितला पाहिजे?

पीयूष मोरे - आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की, तू थेट असं का करतो? तुला वाटतं असेल, तर तक्रार कर.

केंद्रीय राज्यमंत्री- ठीक आहे ना. केलं तर काय बिघडलं, ती माझी मुलगी होती. तिच्या सुरक्षेसाठी तर मी लोकांना तिथे ठेवलं आहे ना. मग? तुम्हाला काही असतं ना, तर तुम्ही या पातळीपर्यंत गेले नसते. 

पीयूष मोरे - नाही. नाही. आम्ही त्याला हाकलले. त्यात आमदारांचा काही विषयच नाही. 

केंद्रीय राज्यमंत्री - त्यांचेच लोक होते ना? 

पीयूष मोरे - त्यांचेच लोक होते ते. तिथलेच. सर्वच मुलं तिथे होते. 

केंद्रीय राज्यमंत्री - पीयूष, तुझ्याकडून तरी मला ही अपेक्षा नव्हती. तुम्ही कोणत्याही पक्षात जा, पण जरा माणुसकी ठेवत जा. 

पीयूष मोरे - सपोर्ट करण्याचा विषयच नाही. 

केंद्रीय राज्यमंत्री - ही वागण्याची पद्धत नाही. 

पीयूष मोरे - त्या चोपडेलाही काहीही चुकीचं बोललो नाही. त्याला फक्त एवढंच म्हटलं की, तू असं थेट कसं करतोय?

केंद्रीय राज्यमंत्री - अरे पण तुम्हाला गरज काय होती? माझ्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी त्याने बघितले. तू का त्या समोरच्याला बोलला नाही की, तू कशाला इथे बसलास?

पीयूष मोरे - मी चोपडेला बोललो नाही. आणि ताई, मला तिथे गेल्यानंतर विषय माहिती पडला. मला तर आधी विषय पण माहिती नव्हता. 

केंद्रीय राज्यमंत्री - हे बरोबर नाही. तुला मी पोलीस ठाण्यात खेचणार. मी सगळ्यांची नावं टाकणार आहे, लक्षात ठेव. तुम्हाला जर आमदाराकडे जायचं की शिंदे साहेबांकडे जायचं.

पीयूष मोरे - आम्ही काहीही चुकीचं केलं नाही. 

केंद्रीय राज्यमंत्री - काय चुकीचं केलं नाही? तुला काय अधिकार आहे त्या पोलिसाला बोलण्याचा? मी आज तिथे नाहीये. पीयूष हे बघ विसरू नको. तुझ्यावर माझे उपकार आहेत. 

पीयूष मोरे - शंभर टक्के खरं आहे ताई. 

केंद्रीय राज्यमंत्री - माझ्या मुलीच्या बाबतीत या पद्धतीवर आला असेल ना, तर मी तुला सोडणार नाही, लक्षात ठेव.

(या ऑडिओ क्लिपची पुष्टी लोकमत करत नाही)

Web Title: raksha khadse daughter molestation case Audio clip of Raksha Khadse calling and scolding Piyush More goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.