पावसाने पीक तारले; अतिवृष्टी, पुराने गिळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST2021-09-13T04:16:34+5:302021-09-13T04:16:34+5:30
चाळीसगाव : चाळीसगाव परिसरावर ३० ऑगस्ट रोजी आभाळच फाटले आणि ३१ रोजी नदी-नाल्यांचे बोट पकडून ते उभ्या पिकात पुराच्या ...

पावसाने पीक तारले; अतिवृष्टी, पुराने गिळले!
चाळीसगाव : चाळीसगाव परिसरावर ३० ऑगस्ट रोजी आभाळच फाटले आणि ३१ रोजी नदी-नाल्यांचे बोट पकडून ते उभ्या पिकात पुराच्या पायांनी घुसले. पिकांना लोळवत काही क्षणात मातीसह मृतदेहांप्रमाणे वाहून घेऊनही गेले. त्यामुळे पावसाने पिकांना तारले. मात्र, अतिवृष्टी, पुराने मारले, अशी या वर्षीच्या खरीप हंगामाची मृतप्राय स्थिती झाली आहे. पुरासह अतिवृष्टीच्या तडाख्याने शेतकरी वर्ग पुरता उन्मळून पडला आहे. त्यांना या आभाळमारातून सर्वार्थाने सावरण्याची नितांत गरज आहे. तथापि, पंचनाम्यांचे गुऱ्हाळ अजूनही सुरूच असल्याने भरपाई मिळणार तरी कधी, असा टाहो पूरबाधित शेतकऱ्यांनी फोडला आहे.
राजकीय स्तरावर आपत्तीचे कवित्व सुरू असून, सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचे हात पुढे केले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी पदरझळ सोसून पुरात घरे वाहून गेलेल्या पूरग्रस्तांसाठी प्रत्येकी ६० रुपये खर्चाची कोटेड पत्र्याची ५० घरे बांधून द्यायला सुरुवात केली आहे. काही दिवसांतच पुरात सर्वस्व गमावलेल्या पूरग्रस्तांच्या डोक्यावर घरांच्या रूपाने हा मायेचा आधार उभा राहणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाहणी दौरे आटोपलेही.
बळीराजाच्या हाती मात्र अजूनही काहीही पडलेले नाही.
चाळीसगाव तालुक्यात यंदा ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला. यात २७ हजार २११ कोरडवाहू तर ३४ हजार ४३७ म्हणजेच एकूण ६० हजार हेक्टर क्षेत्र कपाशी लागवडीखाली आहे. मका लागवड ११ हजार ३८४ हेक्टरवर झाली, तर फळबाग ३००, ज्वारी १२५८, मूग ११५६, उडीद ९३२, तूर ५२८, बाजरी ३,५५१ असा पेरा झाला आहे. सुरुवातीला पूर्व मोसमी पावसाने दमदार हजेरी लावत समस्त बळीराजाच्या अपेक्षा उंचावल्या. यानंतर मृग नक्षत्राने घोर निराशा केली, तरीही ‘पेरते व्हा’ म्हणत, शेतकऱ्यांनी कंबर कसत ३१ जुलैपर्यंत पेरण्या पूर्ण केल्या. भर पावसाळ्याची चार नक्षत्रे कोरडी निघून गेल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या सप्ताहात दुष्काळाचे सावटही गडद झाले होते. २० ऑगस्टनंतर मात्र मोठी ओढ घेतलेल्या पावसाने छत्री उघडत येथे अधून-मधून हजेरी लावायला सुरुवात केली. त्यामुळे माना टाकलेली पिके तरारलीही. ३० ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या पूर्वा नक्षत्राने जोरदार सलामी देत त्याच दिवशी अतिवृष्टीचा दणका दिला.
३१ रोजी आलेल्या पुराने सर्वत्र दाणादाण उडवून देत, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तेवढे ठेवले. हजारो हेक्टरवरील उभी पिके पुराने गिळून घेतली आहे. वाघडू, वाकडी, खेर्डे, बाणगाव, रांजणगाव, रोकडे, पिंपरखेड आदी गावांना पुराचा मोठा तडाखा बसला. ४० हून अधिक नागरिकांची घरे वाहून गेली. पिंपरखेड येथे १६ ऊसतोड मजुरांच्या झोपड्या पुरात गुडूप झाल्या. याच गावांमध्ये नावाला उरलेल्या नद्यांनी पुराच्या रूपाने थैमान घातले. गेल्या शतकात पहिल्यांदाच या नद्यांना असा जीवघेणा पूर लोटल्याने ग्रामीण भाग हादरून गेला आहे.
पुराच्या नुकसानीचे रिपोर्ट कार्डही मोठेच आहे.
१७० घरांचे पूर्ण तर १,४८१ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. २०१ दुकाने, २९० टपऱ्या ७५ झोपड्या, ३५ गोठाशेड, ६८४ शेतकरी व पशुपालकांची १,९३७ लहान तर ६१३ मोठी दुधाळ जनावरे पुरात गतप्राण झाली. याचा थेट परिणाम दूध उत्पन्नावर झाला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून तालुक्यात मोठ्या संख्येने पशुपालन केले जाते. पुरामुळे हे चक्रही कोलमडले आहे. एका दिवसात शिकाऱ्यांनी सावज हेरून टिपावे, याप्रमाणे ११ हजार २३१ पक्ष्यांचे घासही अतिवृष्टी व पुराने घेतले असून, यावरून पुराचे सावट किती आक्राळविक्राळ होते, हे समजून यावे. पुराच्या जखमा भळभळत असतानाच, पुन्हा आठ दिवसांच्या अंतराने मंगळवारी तालुक्यावर आभाळ कोपले. नांदगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मन्याड धरणातून एक लाख क्युसेस इतका विसर्ग होत होता. याच परिसरात अनेक गावांना पुराने वेढा दिला. नांद्रे गावाची पुराने कोंडी केली. या परिसरातीलही शेकडो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहे. दुसऱ्यांदा आभाळ फाटल्याने शासकीय यत्रणांचीही पुरती दमछाक होत आहे.