रहिपुरी शिवारात महसूल पथकाने पकडले अवैध वाळूचे तीन ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 21:03 IST2020-08-26T21:03:43+5:302020-08-26T21:03:56+5:30
पहाटेची कारवाई : वाळू माफियांकडून पथकाला अरेरावी

रहिपुरी शिवारात महसूल पथकाने पकडले अवैध वाळूचे तीन ट्रॅक्टर
मेहुणबारे, ता. चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातही मुजोर वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी पहाटे रहीपुरी ता.चाळीसगाव शिवारात गस्त घालणाऱ्या महसूल पथकाने तीन ट्रॅ्क्टर पकडले. यावेळी वाळू माफियांनी पथकाशी अरेरावी केली. अवैध वाळू वाहतुक करणारे ट्रॅ्क्टर पथकाने पकडले असता वाळू माफियांनी ते ट्रॅक्टर पळवून नेले. मात्र काही वेळाने पळवून नेलेले ट्रॅ्क्टर पुन्हा जागेवर आणून उभे केले. अवैध वाळू वाहतुक करणारी तिनही ट्रॅक्टर जप्त करून ती मेहूणबारे पोलीसांच्या हवाली करण्यात आले आहेत.
बुधवारी पहाटे मेहूणबारे मंडळाधिकारी गणेश लोखंडे, लांबे वडगाव तलाठी एस.डी. काळे, मेहूणबारे तलाठी एस.बी. चव्हाण यांचे पथक पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास गस्त घालत असतांना रहिपुरी शिवारात गिरणा नदीपात्रात अवैधरित्या वाळू वाहतुक करणारे तीन ट्रॅ्क्टर मिळून आले. त्यापैकी लाल रंगाचे ट्रॅक्टर भगवान एरंडे (खरजई) व दुसरे लाल रंगाचे ट्रॅ्क्टर मिथीलेश साळुंखे व तिसरे लाल रंगाचे ट्रॅ्क्टर सचिन शहाणे दोन्ही रा. चाळीसगाव यांचे आहे. ही तिनही ट्रॅक्टर पथकाने वाळूसह जप्त केली. यावेळी वाळू गस्ती पथकाशी काही जणांनी अरेरावी केली.तसेच धक्काबुक्कीही केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे .