विविध प्रकारच्या तयार मोदकांना पसंती
बाप्पांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर गणपतीच्या आवडत्या मोदकांना मागणी असून, तयार (रेडिमेड) मोदकांनी मिठाईची दुकाने सजली आहेत. यामध्ये तीन प्रकारच्या मोदकांचा समावेश असून, त्यांना मागणी वाढली आहे. पूर्वी तसे घरीच मोदक तयार केले जात होते. मात्र, आता घरगुती मोदकांसह तयार मोदकांनाही पसंती वाढली आहे. बाप्पाच्या आगमनाच्या पूर्व संध्येला व शुक्रवारीदेखील हे मोदक खरेदी करण्याकडे कल होता. सध्या बाजारात मावा, केशरी मोदक, मैदा व खोबऱ्याचे मोदक, काजू मोदक उपलब्ध आहे. यामध्ये मैदा व खोबऱ्याच्या मोदकांना जास्त मागणी आहे. यातील मावा मोदक संपूर्ण १० दिवस उपलब्ध राहणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले, तर इतर मोदक पहिल्या व शेवटच्या दिवसांसह मागणीनुसार उपलब्ध करून दिले जाणार आहे.
सजावट साहित्याचीही खरेदी
मूर्ती विक्रीसह आवश्यक पूजा-विधी, तसेच सजावटीच्या साहित्यांची स्वतंत्र दुकाने थाटली होती. झुंबर, वेगवेगळ्या प्रकारचे हार, माळा, तसेच पूजा विधीचे साहित्य नारळ, मदरा, अगरबत्ती, सुपारी, खारीक याप्रमाणे दुकाने थाटली होती.
जागेअभावी वाहने रस्त्यावर
गणेश मूर्ती व साहित्य ज्या-ज्या ठिकाणी विक्रीस आले होते, तेथे अनेकजण चारचाकी, दुचाकी वाहने घेऊन खरेदीसाठी आले होते. खरेदी दरम्यान वाहने लावण्यासाठी जागा नसल्याने रस्त्याच्या कडेला वाहने लावण्यात आली. त्यामुळे वाहतुकीची कोंडीदेखील होत होती.