लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांची समस्या डोकेदुखी झाली आहे. येत्या काळात जर ही समस्या मार्गी लागली नाही. तर नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल, त्यामुळे शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून शहरातील कामे मार्गी लावावी लागणार असून, जर ही कामे मार्गी लागली नाही तर कोणत्या तोंडाने मत मागायचे अशी खंत बंडखोर ३० नगरसेवकांनी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याकडे व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या उपस्थितीत रविवारी शहरातील पद्मालय विश्रामगृह येथे ३० बंडखोर नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यासह शिवसेनेचे अन्य नगरसेवक उपस्थित होते. शिवसेनेची सत्ता आल्यापासून बंडखोर नगरसेवक व संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती. मात्र, रविवारी झालेल्या बैठकीनंतर हे मतभेद दूर सारले गेल्याची ही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. संपर्कप्रमुखांनी सर्व नगरसेवकांना कोणतीही नाराजी असेल तर सरळ आपल्याशी बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपर्कप्रमुखांनी नगरसेवकांच्या अडचणी सोडविण्यासाठी माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. जर समस्या मार्गी लागत नसेल तर त्याबाबत थेट माझ्याशी संपर्क साधण्याच्या सूचना सावंत यांनी नगरसेवकांना दिल्या आहेत.
केवळ ६१ कोटींच्या निधीतून शहरातील विकासकामे होणार नाहीत, शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महानगरपालिकेला ६१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, या निधीतून शहरातील समस्या मार्गी लागणार नाही. शहरातील समस्या मार्गी लावण्यासाठी शंभर कोटी वरील स्थगिती शासनाने उठविणे गरजेचे आहे. यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून हा निधी महानगरपालिकेला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली. जर हा निधी महापालिकेला उपलब्ध नाही झाल्यास भविष्यात निवडणुकीत नगरसेवकांना मते मागतानादेखील अडचणी निर्माण होतील असेही नगरसेवकांनी सांगितले. याबाबत लवकरच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून या निधीवरील स्थगिती उठविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही संपर्कप्रमुख संजय सामंत यांनी दिली.