लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून जिल्हाभरातील ४५ ग्रामसेवकांच्या पदोन्नत्या करण्याची प्रक्रिया आधीच अतिशय संथगतीने सुरू असताना यात आता सामान्य प्रशासन विभागाकडून फाइलींमध्ये त्रृटी काढण्यात आल्या आहेत. मात्र, ग्रामपंचायत विभागात या कामाची जबाबदारी असलेले कर्मचारी प्रकृती अस्वास्थामुळे रजेवर असल्याने आता हे काम पुन्हा रखडले आहे.
जिल्ह्यातील १३ ग्रामविकास अधिकाऱ्यांची विस्तारअधिकारीपदी, तर ४५ ग्रामसेवकांची ग्रामविकास अधिकारीपदी पदोन्नती होणार आहे. ही प्रक्रिया रखडल्यामुळे स्थायी समितीच्या सभेत यावरून मोठा गदारोळही झाला होता. नेमकी ही प्रक्रिया का रखडली जात आहे? असा प्रश्न उपस्थित करून सदस्यांनी संताप व्यक्त केला होता. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या सभेत येत्या आठवडाभरात पदोन्नत्या करण्याचे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांनी दिले होते. मात्र, या आश्वासनास महिना उलटल्यानंतर दुसऱ्या बैठकीच्या अगदी तोंडावर घाईत या फाईली सामान्य प्रशासन विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. सामान्य प्रशासन विभागाने त्यांची तपासणी केल्यानंतर त्यात काही बाबींची कमतरता आढळून आल्याने त्या पुन्हा ग्रामपंचायत विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, या ठिकाणी अद्याप या फाइली पडून असून, त्यातील त्रृटी दुरुस्त करण्याचे काम अद्याप हाती घेण्यात आले नसून ते ग्रामसेवक पदोन्नतीच्या प्रतीक्षेतच आहेत.